08168
बांधकाम कामगारांना दाखला
देण्याचे आदेश ः नांदोसकर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३० ः ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना ९० दिवस प्रमाणित दाखला देण्याबाबतचे फेर आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाचे अध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी दिली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्गत नोंदणी व नूतनीकरणासाठी शासनाच्या आदेशांनुसार ग्रामसेवकांनी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणित दाखले देणे नियमाधीन असताना ग्रामसेवकांनी त्यास नकार देत संघटनेचा निर्णय सांगून विरोध दर्शविला होता. या संदर्भात श्री. नांदोसकर यांनी कामगार संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. तसा पत्र व्यवहार देखील करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबारात त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांना पूर्ववत दाखले देण्याचे ग्रामसेवकांना निर्देश देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी देखील जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून टाळाटाळ होत होती. याबाबत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाला जाग आली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी सर्व ग्रामसेवकांना आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. याबाबत बांधकाम कामगार कल्याणकारी संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांचे निवेदन देऊन लक्ष वेधले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांना दाखले देण्याचे फेरआदेश मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी पत्राद्वारे दिले असल्याचे श्री. नांदोसकर यांनी सांगितले. यापुढे गावागावातील गोरगरीब कष्टकरी कामगारांना दाखले देऊन ग्रामसेवकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामसेवक संघटनेला करण्यात आले. निवेदन देताना श्री. नांदोसकर, सहसचिव अनिल कदम, सदस्य विनायक मेस्त्री, प्रदीप पाताडे, पंढरी पाताडे उपस्थित होते.
-------------------
...तर बीडीओंना जाब विचारणार
ग्रामसेवक बांधकाम कामगारांना प्रमाणित दाखला देण्यास नकार किंवा टाळाटाळ करत असतील तर अशा कामगारांनी माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांचे आदेश असून सुद्धा ग्रामसेवक सही देत नसतील तर त्या-त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारू, असा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.