गुहागरच्या जागेवर मुख्यमंत्र्यांचा दावा
नवीन पर्यायची तयारी ; जागा वाटपाचा तिढा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० : गुहागर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू आहे; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेवर दावा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येथे मुख्यमंत्री नवीन पर्याय देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना-भाजपमध्ये या जागेवरून पुन्हा मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.
गुहागर मतदार संघ पूर्वी भाजपचा बालेकिल्ला होता; परंतु २००९ मध्ये राज्यातील मतदार संघाच्या पुनर्रचना झाल्या. गुहागरसह चिपळूण आणि खेडचा काही भाग मिळून गुहागर विधानसभा मतदार संघ अस्तित्वात आला. शिवसेना-भाजपच्या जागावाटपात गुहागरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. माजी मंत्री रामदास कदम यांनी येथून निवडणूक लढवली. युतीने उमेदवारी नाकारली म्हणून माजी आमदार विनय नातू अपक्ष उभे राहिले. दोघांचा पराभव करून राष्ट्रवादीने ही जागा ताब्यात घेतली. २०१४च्या विधानसभा निवडणुकीतही या मतदार संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. राष्ट्रवादीच्या तिकिटावर दोनवेळा निवडून आलेले आमदार भास्कर जाधव यांनी २०१९च्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला आणि या मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले; मात्र शिवसेना फुटीनंतर या मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिले. ते मागील पाच वर्ष भाजपवर आणि अलीकडची अडीच वर्ष संधी मिळेल तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना दिसले. त्यांचा पराभव करण्यासाठी भाजपचे येथील स्थानिक नेतृत्व मागील दोन वर्षापासून तयारी करत आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपला साथ मिळावी यासाठी मागील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकत्र येऊन महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा प्रचार करताना दिसले. भाजपचे सरचिटणीस निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातील राजकीय वैर टोकाचे आहे. तेही या वेळी गुहागरमध्ये लक्ष घालण्याची शक्यता आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः गुहागरच्या जागेवर दावा केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री शिंदे गुहागरमधून जवळच्या उद्योजकाला उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली त्यात गुहागरच्या जागेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी दावा केल्याचे पक्षातील कार्यकर्ते सांगत आहेत.
---------
कोट
गुहागर विधानसभा मतदार संघातील जनतेला आजी-माजी आमदार दोन्हीही नको आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिसरा पर्याय देण्याच्या तयारीत आहे. धनुष्यबाणाशिवाय येथे अन्य कोणतेही चिन्ह चालणार नाही. ही जागा अजून शिवसेनेला सुटलेली नाही; परंतु आम्ही मागणी केली असून त्या दृष्टीने तयारीसुद्धा सुरू आहे.
- दीपक कनगुटकर, तालुकाध्यक्ष, शिवसेना गुहागर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.