एसटीचे चित्र वापरावे
अस्वच्छ एसटी अढळल्यास आगारप्रमुखांना दंड
महामंडळाची मोहीम ; प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, तपासणीबाबत साशंकता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३: स्वच्छतेच्यादृष्टीने एसटी बसमध्ये राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. बस अस्वच्छ असतील तर थेट आगार व्यवस्थापकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. रत्नागिरी विभागातील बस स्वच्छ ठेवल्या जात असल्याने अजून विभागातील एकाही आगार व्यवस्थापकावर कारवाईचा बडगा उगारला गेला नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे एसटींची तपासणी होते का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
स्वच्छ एसटी स्थानक मोहिमेनंतर एसटी बसेस स्वच्छतेसाठी आता नवीन मोहीम सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. बसच्या स्वच्छतेबाबत महामंडळाने गांभीर्याने ही मोहीम राबवण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा महामंडळाने दिला आहे. महात्मा गांधी जयंतीच्या एक दिवस आधी अर्थात् १ ऑक्टोबरपासून एसटी बसेसची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. बसमधील अस्वच्छतेवर महामंडळाने लक्ष केंद्रीत केल्याने बसेसची स्वच्छता प्राधान्याने केली जात आहे. आगार व्यवस्थापकांवर गाड्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. महामंडळाकडून सर्व विभागांना स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात हा नियम कागदावर असावा कारण, आतापर्यंत एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पथकांद्वारे गाड्यांची तपासणी तरी होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार परिपत्रक पाठवून, बैठका घेऊन, सूचना देऊनही बसेस स्वच्छतेबाबत स्थानिक प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नाही. यामुळेच दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.
----
दृष्टिक्षेपात...
* बसेस तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक
* महिन्यातून १५ बसेसची तपासणी
* गुण देण्याची जबाबदारी पथकाला आहे
* कमी गुण असणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड
---------
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.