बालक-पालक : बहरू आनंदे ....... लोगो
(२७ सप्टेंबर टुडे ४)
जमील या दहा वर्षाच्या मुलाला त्याची आई माझ्याकडे पोटदुखीसाठी घेऊन आली होती. आतापर्यंत तिने बऱ्याच डॉक्टरांना दाखवले होते. त्यांना काही त्यांच्या पोटदुखीचे शारीरिक कारण सापडत नव्हते. तो अभ्यासात चांगला होता; पण हल्ली त्याला शाळेत जायला आवडायचं नाही. त्याची पोटदुखी बऱ्याचदा रविवारी सुरू व्हायची. सोमवारी सकाळी ती तीव्र व्हायची व त्यामुळे कधी कधी शाळेला सुट्टी व्हायची. शाळेला सुट्टी असताना मात्र त्याला ही पोटदुखी कधीच व्हायची नाही.
- rat३p४.jpg -
P24N15795
- श्रुतिका कोतकुंडे,
सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण
sajagclinic@gmail.com
------
तणावामुळे मुलांमधील शारीरिक त्रास
कधी कधी शारीरिक आजारामुळे जी लक्षणे होऊ शकतात ती शारीरिक कारण नसल्यानेही होऊ शकतात. अशक्तपणा, पोटदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, शरीरातील इतर दुखणी, बोलता न येणे, चालता न येणे, ऐकू न येणे, दृष्टी कमी होणे अशी सर्व लक्षणे शारीरिक कारणाशिवायही उद्भवू शकतात तसेच ती तेवढीच तीव्र व त्रासदायक ठरू शकतात, हे जाणावे. काहीवेळा वैद्यकीय निदान अशक्य होऊन बसते. कुटुंबाला शारीरिक कारण नसलेले रुग्ण त्रासदायक वाटू शकतात, ढोंगी वाटू शकतात; पण रुग्णांवर असे वैतागून उपयोग नाही. अशावेळी तणावाचे कारण शोधून त्याचे निवारण करणे किंवा समस्या किमान सौम्य करणे हे नेहमीच शक्य असते हे जाणावे.
शारीरिक कारण नसणे किंवा कारणापेक्षा समस्या जास्त असल्यास पुढे कसे जावे?
पालकांना विचारावे त्यांना हे दुखणे कशामुळे आहे असे वाटते?
१) पालकांना वाटते का हे दुखणे १०० टक्के शारीरिक आहे?
- पालकांच्या संपर्कातील इतर कुठल्या मुलाला असा त्रास आहे का? आपल्या मुलाला तसाच आजार होईल अशी काळजी त्यांना वाटते आहे का?
२) पालकांना हे दुखणे शारीरिक नसून कदाचित ताणामुळे असू शकते असे वाटत आहे का?
३) पालकांना अजिबात कल्पना नाही दुखणे कशामुळे आहे ते. अशावेळी समुपदेशकाने धीर द्यावा व कारण शोधण्यास मदत करावी. पालकांना असे अजिबात वाटता कामा नये की, शारीरिक कारण नाही म्हणजे मुलाला काही समस्या नाही. जे मूल शाळेत जात नाही, खेळत नाही म्हणजे काहीतरी गंभीर कारण असू शकते व ते कारण शोधण्यास पालकांना मदत करावी. ताणाचे कारण कुठे आहे, शाळेत की घरात ते शोधण्याचा प्रयत्न करावा. पालकांबरोबर मुलांशीही संवाद साधावा. मुलगा आठ वर्षापेक्षा मोठा असेल तर मुलाशी बोलूनही या गोष्टीचा अंदाज येऊ शकतो.
शारीरिक कारण मिळत नसल्यास पालकांमध्ये विविध कल्लोळ असू शकतो. कधी पालकांना पालक म्हणून कमी पडल्याची लाज वाटून अपराधीभाव वाटू शकतो, मुलाबद्दल भीती वाटू शकते. घरातील गुपित, ताण सांगायला पालक प्रसंगी कमी पडू शकतात. आईला कदाचित माहीत असेल की, बापाच्या व्यसनाधीनतेमुळे हे होत आहे. रागाच्या भरात मुलाला खूप मारल्यामुळे आईमध्ये अपराधी भाव असू शकतो. नवऱ्याच्या बाप म्हणून होत असलेल्या चुका आई कदाचित लपवत असेल.
पालकांची तगमग बघून असे विचारता येईल की, काही वेगळे कारण आहे यामागे जे सांगणे जड जात आहे? सांगायचं जरी नसलं तरी काही वेगळे कारण आहे असं वाटतंय का, असेही विचारता येईल. असा मागोवा घेत हळूहळू कल्पना येऊ शकते की, या दुखण्याचे कारण काय आहे? लक्षणाचे कारण लक्षात आले तरी लगोलग बदल होणे शक्य नसले तर मुलाची वेदना कमी होण्यासाठी उपाय करता येतील. तिसरी शक्यता म्हणजे धांडोळा घेऊनही अजून कल्पनाच नाही. अशावेळी वेदना कमी करण्यासाठी उपाय सुचवता येतील.
- उपचाराचे उद्दिष्ट
* शारीरिक आजाराची शक्यता पूर्णपणे दूर करणे हे सर्वात महत्वाचे
* पालकांना शारीरिक लक्षणाच्या पलीकडे बघण्यासाठी तयार करणे
* लक्षणांची ताणाशी निगडित विविध कारणांचा धांडोळा घेणे
चर्चेअंती पालकांबरोबर पुढची योजना आखावी जेणेकरून मुलाचे आयुष्य पूर्ववत व्हायला मदत होईल. शाळेशी संपर्क करावा व शिक्षकांची मदत घ्यावी जेणेकरून ताणाचे कारण शाळेत असल्यास त्यावर तत्परतेने कार्यवाही होईल तसेच शाळेत परतताना ताण कमी करता येईल. पालकांना व मुलाला धीर देऊन ताणाचे व पर्यायाने शारीरिक लक्षाणांचं कारण स्वीकारण्यास मदत करावी व उपचार घेण्यास प्रोत्साहन द्यावे.
जमीलशी बोलून कळाले त्याचे वर्गमित्र त्याची टिंगल करी व त्याला त्रास देत असत. शाळेतील शिक्षकांच्या मदतीने त्यावर तोडगा काढला गेला. हळूहळू जमीलची पोटदुखी कमी होत गेली व तो नियमित शाळेत जाऊ लागला.
(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.