नवदुर्गा------लोगो
-rat३p१४.jpg-
२४N१५८७३
संध्या सुर्वे
-----------
संगीताचे २५ वर्षे धडे देणाऱ्या संध्या सुर्वे
गायनाबरोबरच संगीत नाटकांमध्येही काम; अनेक पुरस्काराने गौरव
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः वडील नाट्यप्रेमी आणि आई संगीतप्रेमी, त्यामुळे रत्नागिरीतील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री संध्या सुर्वे यांना घरातच दोन्हीचे बाळकडू मिळाले; मात्र वडील शासकीय सेवेत असल्यामुळे त्यांची वारंवार बदली होत होती. त्यामुळे संगीत शिक्षणात खंड पडायचा; परंतु धीर न सोडता जमेल तशी संगीतसाधना सुरू ठेवत सुर्वे यांनी संगीतक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. ‘स्वरसंध्या’ या स्वतःच्या संगीत विद्यालयातून नवोदितांना गेली २५ वर्षे सुगम व शास्त्रीय संगीताचे धडे देत आहेत. संगीत आराधनेबरोबरच त्यांची अभिनेत्री म्हणूनही ओळख आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त संध्या सुर्वे यांच्याशी संवाद साधला. त्यांचे वडील (कै.) रवींद्र सुर्वे हे नाट्यप्रेमी आणि हौशी रंगभूमीवरील कलाकार. आई रेखा सुर्वे ही संगीतप्रेमी. त्यामुळे घरातूनच त्यांना संगीताचे बाळकडू मिळाले. लहानपणापासूनच रेडिओवर अनेक बुजुर्ग गायकांची गाणी ऐकलेली होती. त्यामधूनच त्यांना गायनाची आवड निर्माण झाली. शास्त्रोक्त मार्गदर्शनाशिवाय चांगलं गाणं म्हणता येत नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी संगीत आराधनेला सुरवात केली. त्यांचे वडील शासकीय सेवेत असल्याने त्यांच्या बदलीमुळे संगीत शिक्षणात खंड पडायचा; परंतु धीर न सोडता त्यांनी जमेल तशी संगीतसाधना सुरू ठेवली आणि त्याचे फळही मिळाले. रत्नागिरीत आल्यावर खऱ्या अर्थाने संगीत शिक्षणात स्थैर्य आले. येथील संगीततज्ज्ञ सुलभा काकतकर बाई, (कै.) विनायकबुवा रानडे, उज्ज्वलाताई पटवर्धन, मृणालताई परांजपे यांचे शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर बीएससी या पदवीबरोबरच सुर्वे यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली. पुढील शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठात संगीत व नाट्यशास्त्र विभागात एमए संगीतसाठी प्रवेश घेतला. कोल्हापूरच्या ख्यातनाम गायिका डॉ. भारती वैशंपायन, अरूण कुलकर्णी यांचे शास्त्रीय संगीताचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रसाद गुळवणी (नागपूर), डॉ. रवींद्र घांगुर्डे (पुणे) यांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले. एमए संगीत ही पदव्युत्तर परीक्षा त्या विशेष योग्यतेसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यासाठी युनिव्हर्सिटीकडून अंबुजा सोनटक्के, आनंद लिमये, पं. नाना अलियाज आणि मधुकर सडोलीकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुर्वे यांना आकाशवाणीची मान्यताप्राप्त गायिका आणि नभोनाट्य कलाकार म्हणून श्रेणी मिळाली.
नाटक हे रक्तातच असल्यामुळे वडिलांबरोबर हौशी रंगभूमीवर त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका साकरल्या आहेत. नाटकापेक्षा गायनाची आवड अधिक होती. त्यामुळे हळूहळू नाटक मागे पडले; पण काही वर्षांनी त्यांना संगीत नाटक नावाची आणखी एक वाट सापडली. अनेक संगीत नाटकातून प्रमुख गायिका अभिनेत्री म्हणून भूमिका करत आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यातर्फे होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या परीक्षांसाठी गेली अनेक वर्षे परीक्षक म्हणून काम करत आहे.
------
कोट
सरस्वतीनं कधी उपाशी ठेवलं नाहीच उलट संकटातही न डगमगता जगण्यासाठी आत्मिक, मानसिक बळ भरभरून दिलं. जीवनाच्या चढ-उतारात गुरूंचं स्थान अढळच राहील. अनेक अडचणींना तोंड देत संगीतक्षेत्राशी नातं दृढ झाले आहे.
- संध्या सुर्वे, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.