16293
‘हत्ती, घूस, रेडा, गेंडा’ नाटकाने मने जिंकली
कणकवलीत आचरेकर प्रतिष्ठानच्या शुभारंभी प्रयोगाला दाद
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ : शहरातील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नव्या नाटकाचा प्रारंभ प्रतिष्ठानच्या रंगमंचावर ज्येष्ठ कवी, लेखक रंगकर्मी डॉ. राजीव नाईक यांच्या हस्ते झाला. प्रतिष्ठानच्या कलावंतांनी ‘हत्ती, घूस, रेडा, गेंडा’ या नव्या नाटकाची निर्मिती केली आहे.
नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित प्रा. प्रवीण बांदेकर, सार्वजनिक बांधकाम कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, कुडाळ येथील ज्येष्ठ रंगकर्मी श्री चंदू शिरसाट, अजय वैद्य, सुनील पाटील, प्रसाद घाणेकर, आदी उपस्थित होते.
सीरियन नाटककार सादल्ला वानौस यांच्या ‘द एलिफंट, द किंग ऑफ टाईम’ या नाटकापासून प्रेरित होऊन ‘हत्ती, घूस, गेंडा, रेडा’ या नाटकाची संकल्पना दिग्दर्शक केतन जाधव यांनी विकसित केली आहे. योगेश्वर बोंद्रे यांनी संहिता लेखन केले आहे. सत्ताधीश आणि सामान्य प्रजा यांच्यातील असलेला ‘सनातन विसंवाद’ हे या नाटकाचे कथाबीज आहे. समकालीन संदर्भ घेत विनोदाच्या माध्यमातून या विसंवादावर केलेले तिरकस भाष्य वेळोवेळी रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद घेऊन गेले. शशिकांत कांबळी आणि सहकाऱ्यांचे पार्श्वगायन, संगीत साथ, नामानंद मोडक यांचे नेपथ्य, शाम चव्हाण आणि धनराज दळवी यांची प्रकाशयोजना, प्रणाली चव्हाण यांनी केलेली वेशभूषा यामुळे नाटक अधिक रंगतदार झाले. दरम्यान, प्रयोगानंतर सर्व कलावंतांचा सत्कार करताना डॉ. राजीव नाईक यांनी ‘‘असे नाटक कणकवलीत निर्माण होणे हे मी महत्त्वाचे मानतो. माझा विद्यार्थी असलेल्या केतन जाधव या दिग्दर्शकाच्या या प्रयोगाने माझ्यातील गुरू संतुष्ट आहे, याची जाणीव झाली.’’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
---
अभिनय अन् संगीताला सुयोग्य मेळ
ललित कला केंद्र, पुणे येथे प्रशिक्षित दिग्दर्शक केतन जाधव यांनी शारीरिक हालचाली, गाणी, संगीत आणि अभिनेते यांचा सुयोग्य मेळ घालत नाटकाचा आशय प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. सुदिन कदम, विकास कदम, दीक्षा पुरळकर, प्रतीक्षा कोयंडे, सिद्धेश खटावकर, कांचन खानोलकर, महेश चिंदरकर, राकेश काणेकर आणि शरद सावंत या कलावंतांनी उत्स्फूर्त अभिनय करत रसिकांना खिळवून ठेवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.