पॅरोलवर सुटलेल्या आरोपीवर गुन्हा
रत्नागिरी : गोवा राज्यात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणारा कैदी ३० दिवसांच्या पॅरोलवर रत्नागिरीत आला. रजा संपल्यानंतर कारागृहात परत न गेल्यामुळे येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॅरोल रजेवर आल्यानंतर परत न जाण्याची ही रत्नागिरीतील दुसरी घटना आहे. शहरातील मिरकरवाडा येथे तो राहत होता. चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (३३, मूळ रा. विजापूर, कर्नाटक) असे या कैद्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात गोवा राज्यातील मडगाव शहर पोलिस ठाण्यात २६ सप्टेंबर २०१९ ला खुनाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला मडगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला दक्षिण गोव्यातील बार्देश तालुक्यातील कोलवाळ येथील कारागृहात पाठवण्यात आले होते. त्याला ११ जुलै २०२४ ते ९ ऑगस्ट २०२४ अशी एकूण ३० दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. या कालावधीत तो रत्नागिरीच्या मिरकरवाडा येथे मस्तान मोहल्ल्यात एका व्यक्तीकडे राहणार होता. ३० दिवसांनंतर ९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्याने स्वतःहून कोलवाळ कारागृहात हजर होणे आवश्यक होते. परंतु तो अद्याप हजर झालेला नाही. त्यामुळे कोलावाळ कारागृहातून रत्नागिरी पोलिस अधीक्षकांना पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्र पाठवण्यात आले होते. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस फौजदार पालांडे अधिक तपास करत आहेत.
-------
कोकणनगरला जुगारावर कारवाई
रत्नागिरी ः शहरातील कोकणनगर येथील चायनिज सेंटरच्या मागे उघड्या जागेत विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी साहित्यासह १ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असिफ फक्रुद्दीन काद्री (६०, रा. कोकणनगर अन्सार चौक, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.३) दुपारी दीडच्या सुमारास निदर्शनास आली. कोकणनगर येथे विनापरवाना मटका जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत संशयिताकडे साहित्यासह १ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमलदार करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.