16378
सावंतवाडी ः विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील काजू, आंबा बागायतदार व शेतकऱ्यांनी शुक्रवारी येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले. (छायाचित्र ः रूपेश हिराप)
सिंधुदुर्गातील काजू बागायतदार आक्रमक
सावंतवाडीत उपोषण; सहहिस्सेदाराच्या संमतीची अट रद्द
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः शासनाने काजू बागायतदारांसाठी घोषित केलेल्या अनुदानासाठीच्या अटी तत्काळ वगळण्यात याव्यात आणि अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील काजू बागायतदार आज येथे एकवटले. येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण करत जोरदार घोषणा दिल्या. पाऊस कोसळत असतानाही सर्वजण ठाण मांडून होते.
अखेर उपोषणाची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सहकार पणन व वस्त्र विभागाच्या मुख्य सचिवांमार्फत काजू बागायतदारांसाठी आवश्यक असलेली सहहिस्सेदारांच्या संमत्तीची अट वगळून हमीपत्रावर अनुदान देण्यास मान्यता देण्यात आल्याचे पत्र मिळवून दिले. ते तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उपोषणकर्त्यांना दिले; मात्र काजू अनुदानासाठी जीएसटीची अट वगळली नसल्याने शेतकरी, बागायतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या बुधवारपर्यंत शासनाने जीएसटीची अटही रद्द करावी; अन्यथा पुन्हा एकदा प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्याबरोबरच बांदा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देऊन उपोषण स्थगित करण्यात आले.
शासनाने काजू अनुदानापोटी २७९ कोटी मंजूर केले; मात्र त्यासाठी स्टॅम्प पेपरवर सहहिस्सेदारांचे संमतीपत्र तसेच काजू विक्री व्यापाऱ्यांकडून जीएसटीची पावती अशा जाचक अटी होत्या. परिणामी शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले. या अटी रद्द करव्यात तसेच काजू बी ला प्रतिकीलो २०० रुपये हमीभाव मिळावा, परदेशी काजूवरील आयात कर २० टक्क्यापर्यंत आकारण्यात यावा, स्वामिनाथन आयोगाची त्वरित अंमलबजावणी करावी, नारळ, सुपारीला पीक विमा संरक्षणमध्ये घ्यावे, आंबा, काजू पिकांच्या थकीत विम्याची रक्कम त्वरित द्यावी, वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, शेतीचे संरक्षण करावे, आदी मागण्यांसाठी आंदोलन होते. त्याला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सावंतवाडी-दोडामार्ग फळबायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी नेतृत्व केले. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सुरेश गावडे, चंद्रशेखर देसाई, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अर्चना घारे-परब, भाजपचे संजू परब, माजी आमदार राजन तेली, शिंदे शिवसेनेचे तालुका संघटक मायकल डिसोजा, अखिल भारतीय मराठा समाज जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनीही पाठिंबा दर्शवला.
शासनाविरोधात शेतकऱ्यांची एकजुटीने उभे राहावे, असे सावंत म्हणाले. अण्णा केसरकर म्हणाले, ‘‘येथे स्थानिक आमदारांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. प्रत्येकजण आपला वापर करून घेत आहेत; परंतु, शेतकऱ्यांनी यातून धडा घेत लढा तीव्र करावा.’’ तेली म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी पक्षभेद विसरून एकजूट दाखवावी. यासाठी मी शासनाचा भाग असलो तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभा राहीन.’’ सौ. घारे-परब म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांचा हक्क कोण काढून घेत असेल, तर गप्प बसू नका. बळीराजा आमची अस्मिता आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या माध्यमातून लढ्यात नक्कीच उभी राहीन.’’ शेतकरी प्रमोद गावडे, प्रवीण पंडित, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, जयदेव गवस, आसावरी सुकी, संजय देसाई, एकनाथ नाडकर्णी आदी सहभागी होते.
दरम्यान, उपोषणस्थळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दाखल होत सहकार पणन वस्त्र विभागाचे पत्र उपोषणकर्त्यांना दिले. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही उपोषणकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. काजू बी ला दोनशे रुपयांचा हमीभाव देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा सुरू आहे. यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. अन्य मागण्यांबाबतही प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.