लाल मातीतील अर्क-अर्कट------लोगो
17710
इंट्रो
कोकण...जशी इथली खडकाळ माती तशी इथली माणसेदेखील खडबडीत आणि चिवट. अथक मेहनत केल्यावर कुठे तुटपुंजी फळे देणारी ही भूमी. त्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या काळाच्या कॅन्व्हासवर श्रमाचे फटकारे ओढत आयुष्य ओढत नेणारी माणसे. त्यांचे भावविश्व जाणून घेणे, त्यांना समजून घेणे हे एक मोठे आव्हानच! नेकी कर और दर्यामें डाल अशी इथली खडतर भूमी...या भूमीतील एक अर्क देवधर मास्तर !
- राजा बर्वे, परशुराम
-----
मिश्किल अन् भित्रेही देवधर मास्तर
एक काळ होता जेव्हा व्हर्नक्युलर फायनल म्हणजे सातवीची परीक्षा पास केली की, शिक्षकाची नोकरी मिळत असे. आधी गावात शाळा सुरू करायची, एक-दोन वर्षे मोफत शिकवायचे आणि मग शासन त्या शाळेला मान्यता देऊन त्या शिक्षकाला नोकरीत घेत असे. त्या काळी शिक्षकांमध्ये एकमेकांना ''तुझी अ. नो. सु. ता.'' काय रे?'' असा प्रश्न विचारायची पद्धत होती. वडील आणि मोठी बहीण असेच ''चिकटलेले'' शिक्षक. त्यामुळे हे सगळे शब्द कानावर पडत असत. अनोसुता= अखंड नोकरीच्या सुरवातीची तारीख हे कळायला मला बरेच दिवस गेले. मग तो किंवा ती शिक्षिका मुख्य धारेला लागत असे ती अगदी रिटायर होईपर्यंत. आमचे देवधर मास्तरसुद्धा असेच चिकटलेले.
माझे वडील ज्या शाळेत हेडमास्तर होते त्या शाळेत देवधर मास्तर उपशिक्षक होते. वय सुमारे पन्नाशीच्या जवळपास, रोज चिपळूणहून सायकलवरून शाळेला येत असत. ठरलेला पेहराव, सायकलवरून येताना संघाची खाकी हाफ चड्डी, बंद दोन बटनांचा शर्ट, सफेद गांधीटोपी. साडेदहा वाजताची शाळा. देवधर मास्तरांच्या सायकलची घंटा बरोब्बर सव्वादहाला वाजायची. पहिला मुक्काम आमच्या घरी. गजाला सायकल साखळीने बांधून मास्तर आत येत. थोडं हुश्श झालं, पाणी पिऊन झालं की, मग वडील आणि त्यांचा चहा होई. वेळ असेल तर तंबाखूची एखादी चिलीम होई. मग बगल थैलीतून शुभ्र लेंगा, शर्ट काढून बदलून झाला की, पावसाळा असेल तर पोटरीला स्टीलच्या क्लिप लावून लेंगा चिखल लागू नये म्हणून वर घेत. उन्हाळा असेल तर गळ्याच्या आत कॉलरखाली एक रूमाल सरकवत. मग दोघे मिळून शाळेत जात. संध्याकाळी परत हे सगळं उलट्या क्रमाने होई आणि मास्तर चिपळूणची वाट धरत. कधी शाळेचे इन्स्पेक्शन असेल तर आमच्याकडे वस्ती करत.
देवधर मास्तर मिश्किल तितकेच भित्रेसुद्धा. सदैव कोल्हटकरांच्या नाटकातली पदे गुणगुणत. एखादी गाण्याची लकेर घेतली की, हवेत बोटे उडवत आणि समेवर आल्यासारखे खसकन नाकातला एखादा बाहेर आलेला केस उपटत. "राजाभाऊ, कितवीत तुम्ही? आणि कोणत्या शाळेत जाता?" "मी युनायटेडला, आठवीत" असे उत्तर दिले की मग, "अच्छा, म्हणजे आमच्या रामभाऊ बापट युनिव्हर्सिटीत का? म्हणजे उत्तम पैलू पडणार तुम्हाला, काळजीच नको", अशी काहीतरी चेष्टामस्करी ठरलेली.
एकदा मास्तरांनी रावतळ्यातले घर दुरुस्तीला काढले. चिरणीमधल्या एका खाणीतून दोन गाड्या चिरा घेतला. काडवली, पोसरे इथून लाकडे, वासे घेतले. दोन गाड्या म्हणजे 400 दगड. त्यांच्याबरोबर एक घाटावरचे खापणे म्हणून शिक्षक रोज असेच चिपळूणहून सायकलने येत असत. रोज परत जाताना मग देवधरांचे हे अवजड चिरे रोज दोन असे दोघांच्या सायकलच्या कॅरीयरला लावून नेत असत. वडील एकदा त्यांना बोलले, "अरे विश्वनाथ, रोज उरीपोटावरून हे ओझे नेतोस, त्या खापणेला त्रास देतोस त्यापेक्षा एकादा ट्रक करून नेना!!".. त्यावर "बर्वे मास्तर, सूचना तुमची चांगली; पण ट्रकच्या भाड्यात माझी सिमेंटची १०० पोती येतील आणि रिटायर झालो की, पोरांना सांगेन, या घराचा एकेक चिरा मी स्वतः ओझ्याने आणला आहे." त्यावर वडील निरूत्तर.
कधी पाऊस जास्त किंवा चिपळुणात पाणी भरले किंवा अगदी कोणाचे लग्नकार्य असेल तर देवधर मास्तर खुशाल दांडी मारत. दुसरे दिवशी हजर झाले आणि कोणी साहेब आले गेले नसले तर सही करत; पण रजेचा अर्ज देत नसत. वडील मुख्याध्यापक असल्याने सांभाळून घेत. चिपळूणमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मित्रांना हे माहीत होते. एकदा कोणा शिक्षकाचे परशुरामला लग्न होते. मास्तरांची दांडी. बरोबरच्या शिक्षकांना देवधर मास्तरांचा भित्रा स्वभाव माहीत होता. लग्नाचा मुहूर्त जवळ आला तसा एक शिक्षक देवधर मास्तरांना म्हणाला, " मास्तर, शाळेत रजेचा अर्ज दिलात ना की, दांडी आहे ? बाकी काही नाही हो, वर दीक्षितांच्या इथे फफे साहेब आलेत ते आताच तुमच्या शाळेत जाऊन आलेत याच लग्नाला, तुमची चौकशी करत होते". मास्तरांना घाम फुटायला सुरवात झाली होती. फफे नावाचे जि. प. शिक्षण विभागात एक सीनियर इन्स्पेक्टर होते आणि फार शिस्तप्रिय आणि कडक अशी त्यांची ख्याती होती. एवढ्यात दुसरे शिक्षक बाहेरून हॉलमध्ये आले आणि मास्तरांना म्हणाले, ‘‘मास्तर, तुम्हाला फफे साहेबांनी दीक्षितांच्या घरी बोलावले आहे. बहुतेक सर्वांच्या समोर हजामत नको म्हणून असेल, जा लगेच बघू". झालं, हे ऐकल्यावर मास्तरांच्या हॉलमध्ये येरझारा सुरू झाल्या. मध्येच पाणी पित, चपला पायात सरकवत, परत काढून ठेवत. अखेर धीर करून दीक्षितांकडे गेले. दबकत दबकत आत गेले तर कोणीच आलेले नव्हते. हा सगळा प्लॅन बरोबरच्या मास्तर मंडळींनी रचला होता. अर्थात, त्यामुळे फरक काही पडला नाही. फक्त सावधगिरी म्हणून बिनतारखेचा एक अर्ज कायम देवधर मास्तरांनी वडिलांकडे देऊन ठेवायला सुरवात केली.
देवधर मास्तरांचे शिकवणे मात्र सुरेख असे. पुलंच्या चितळे मास्तरांची आठवण यावी असे. मुळाक्षरे, बाराखडीपासून पाठवाचन, प्रश्नोत्तरे आणि अवांतर चर्चा, अंकगणित, बीजगणित यातून मुलांकडून तयारी करत. अनेक लोक आजही देवधर मास्तरांची एक उत्तम व्यवहारी शिक्षक म्हणून आठवण काढतात. पोर चुकले की, मास्तर त्याचा कान किंवा पोट चिमटीत पकडून असे पिरगळत असत की, परत मुलांकडून ती चूक होत नसे. मग तो मुलगा असो की, मुलगी. त्या काळी मुलांचे पालक एकदा मास्तरांच्या हवाली पोरे केली की, मग काही बोलत नसत आणि विनयभंग, भावना दुखावणे हे शब्ददेखील जवळपास कोणाच्याच शब्दकोशात नव्हते, अशी ही कोकणातली माणसे. आयुष्याच्या खडबडीत रस्त्यांवरून चालताना परिस्थिती आणि काळ या दोघांनी त्यांनादेखील असेच खडबडीत आणि निडर केले होते. विपरित तेच घडेल ही मनोवृत्ती घेऊन अशा किती पिढ्या इथे जन्माला येऊन काळाच्या आड निघून गेल्या. आज पन्नास पावलांवर जायचे असेल तर गाडीला किक मारणारी तरुण पिढी पाहिली की, मला सायकलच्या कॅरियरवर अवजड चिरा रचून पेडल पायाने दाबताना नाट्यपदांच्या मस्त लकेरी घेणारे देवधर मास्तर आठवतात.. ज्या कोकणाने माणसांना असे चिवट बनवले त्याच कोकणात असा कोणता बदल झालाय की, आताची पिढी आयुष्याला अशी टक्कर देण्यात कमी पडत आहे याचे उत्तर शोधून मात्र सापडत नाही हेच खरे !!
(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.