भात कापणीचा निवडणुकीवर परिणाम
शेतकरी व्यस्त ः परतीच्या पावसामुळेही नाकीनऊ
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २२ ः विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, प्रचाराचा धुरळा अजूनही उडालेला नाही. याचे कारण सध्या परतीचा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे भात कापणी रखडली आहे. आता प्रचार अगदी भात कापणीच्या हंगामात येणार असल्याने जाहीर सभांवर मर्यादा येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने यंदा विधानसभेची निवडणूक अगदी दिवाळीच्या हंगामात जाहीर केली आहे. त्यातच कोकणात भात शेतीचा हंगाम अगदी तोंडावर आला आहे. परतीच्या पावसाने आपले वेळापत्रक लांबवल्याने भात कापणीला अद्याप सुरुवातही झाली नाही. त्यामुळे येत्या आठवड्याभरात पावसाने माघार घेतली तर गावागावात भात कापणीला सुरुवात होणार आहे. वर्षभराचे पीक हातात तोंडात येत असताना पाऊस सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसान भरपाई तर अद्याप मिळालेले नाही. पण, निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी सहभागी होतील. याबाबत राजकीय कार्यकर्त्यांना खात्री राहिलेली नाही. कारण भात कापणीचा हंगाम सुरू झाला तर जाहीर सभांवर मर्यादा येणार आहेत. उमेदवारी अर्ज आणि छाननीची प्रक्रिया पुढच्या आठवड्यात पूर्ण होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत येणार आहे. प्रचाराचा अंतिम दिवस १८ नोव्हेंबर आहे तर मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या १५ दिवसात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. तत्पूर्वी भात कापणी उरकली तरच शेतकरी प्रचारात सहभाग होतील. पण, कार्यकर्त्यांना हातातली कामे बाजूला ठेवून प्रचारात उतरावे लागणार आहे. लोकसभा निवडणुका सहा महिन्यांपूर्वीच उरकल्या. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात परिपूर्ण असे नियोजन आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी दिवाळीनंतरचा कालावधी सोयीस्कर असल्याचे मानले जात आहे. याचेही नियोजन प्रत्येक उमेदवाराने सुरू केली आहे.
---
दोन - तीन दिवसांत चित्र स्पष्ट
दोन-तीन दिवसांत कणकवली विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत येणार आहे. पुढचा आठवडा हा दिवाळी उत्सवाचा आहे. त्यामुळे प्रचारासाठी दिवाळीत गाठीभेटी घेण्यासाठी कार्यकर्ते अधिक उत्सुक असतील, असे चित्र आहे. पण, शेती आणि शेतीची कामगत ही पुढच्या आठवड्यातच सुरू होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांवरही प्रचाराच्या मर्यादा येणार हे निश्चित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.