लोगो ः सावंतवाडी विधानसभा
---
25844
राणेंनी दीपक केसरकरांसाठी
मतदार बाधवांना फसवू नये
राजन तेली ः आडाळीत पाचतरी उद्योग आणून दाखवा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः येथील मतदारसंघातील जनतेचा महाविकास आघाडीला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दीपक केसरकारांसह महायुतीच्या नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. आडाळी एमआयडीसीत पाचशे नको पाच कारखाने आणून दाखवा, राणेंना माझे ओपन चॅलेंज आहे. तुम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असताना तुम्हाला काय जमले नाही ते आता काय जमणार? असा सवाल करत केसरकारांसाठी येथील जनतेची फसवणूक करू नका, असा टोला महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी लगावला.
शहरातील झिरंगवाडी परिसरात बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, दिलीप नार्वेकर,संदीप निंबाळकर, राजू मसूरकर, जावेद शेख, विशाल जाधव, दादा पडवेकर, तौसीफ आगा, हमीद शेख, इलीयाज आगा यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत आम्ही तेली यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली.
श्री. तेली हे कार्यसम्राट उमेदवार आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहेत. कायम जनतेत राहून काम करणारा उमेदवार आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे ज्यांनी या मतदारसंघाचा विकास रखडवला, स्वतःची प्रॉपर्टी वाढविली आणि आपण जमीन विकून निवडणूक लढवितो असे सांगून लोकांची दिशाभूल करणाऱ्या केसरकरांना घरी बसवा. मुस्लीम बांधवांनी घाबरून जाऊ नये. काहीही झाले तरी हिंदू-मुस्लिम या ठिकाणी एकत्रच राहतील, असा विश्वास व्यक्त करत ‘मशाल’ चिन्हासमोर बटन दाबून तेली यांना विजयी करा, असे आवाहन उपस्थित महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
-------------------
25843
धनशक्तीसमोर मतदारसंघातील
जनता आता झुकणार नाही
अर्चना घारे-परब ः मतपेटीतून प्रचिती दाखवून देतील
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १७ ः पंधरा वर्षे सत्ता गाजवून भाजप, शिवसेना उमेदवार सावंतवाडी मतदारसंघात विकासात्मक बदल घडवू आणू शकले नाहीत. आता त्यांच्याकडून इथल्या जनतेने अपेक्षा काय धरावी? येथील सुज्ञ जनता येणाऱ्या २० तारखेला मतपेटीतून त्यांना प्रचिती दाखवून देतील. धनशक्ती समोर झुकणारी ही जनता नसल्याचे अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी सांगितले.
सौ. घारे-परब यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यांच्या सोबत अॅड. नकुल पार्सेकर, सुभाष दळवी, संदीप गवस, प्रदीप चांदेलकर, ममता नाईक, प्रिया देसाई, सुदेश तुळसकर, उल्हास नाईक, सुभाष लोंढे, गौतम महाले, महादेव देसाई, आनंद तुळसकर, सागर नाईक, साई शिरोडकर, रविकिरण गवस, वैभव नाईक, विनायक देसाई, ज्ञानेश्वर गवस, रिद्धी मुंगी, माधुरी वेटे, प्रतीक्षा मुंगी, सिद्धी तुळसकर, दीपिका चांदेलकर, सुनिता भाईप, विवेक गवस, ग्रामस्थ, महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.
त्या म्हणाल्या, ‘‘सावंतवाडी मतदारसंघात आम्ही प्रचार करत असताना सर्व महिला वर्ग आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. गेली १५ वर्षे सत्तेत असणाऱ्यांनी आमच्यासाठी काय केल नसल्याचे प्रत्येक नागरिकाच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. साधे रोजगार आणू शकले नाहीत, विकास नाही, रस्ते नाही अशा प्रतिक्रिया देणारी जनता आता बदल घडवण्यासाठी आमच्या बाजूने आहे. दोडामार्गमध्ये शेतकऱ्यांना उद्भवणारा जंगली प्रश्नांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. झाड तोडल्यास त्याला ५० हजार दंड आकारण्यात ला आहे. तो मी निवडून आल्यावर शिथिल करण्यासाठी प्रयत्न करेन. रस्ते बांधकाम करताना भ्रष्टाचार मुक्त कारभार मी करणार आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांचा पराभव निश्चितच होणार आहे.’’
महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी अर्चना घारे परब या राजकारणात नव्या आहेत. म्हणून त्या काहीही बोलत आहेत, असे उद्गार काढले होते. याला त्यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. त्यांना आता माझी भीती वाटू लागली आहे. ते आता पाराभवाकडे झुकत आहेत. आमच्या बाजूने जनशक्तीचा वाढता कौल बघून ते असे बोलत आहेत, असे त्या म्हणाल्या. दिवस रात्र आम्ही मतदारसंघात फिरत आहोत. हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनतेच्या सेवेचा त्यांनी वसा हाती घेतल्याचे दशावतारी कलाकारांनी यावेळी सांगितले.
............
25845
दीपक केसरकर निवडणुकीत
विजायाचा चौकार मारतील
नितीन मांजरेकर ः समान न्याय देत मतदारसंघाची सेवा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः आजच्या घडीला एकही गुन्हा नसणे ही एखाद्या राजकीय नेत्याच्या आयुष्यातील खुप मोठी कमाई आहे. त्यामुळे दीपक केसरकर हे विजयाचा चौकार निश्चितच लगावणार आहेत, असा विश्वास वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर यांनी व्यक्त केला.
प्रसिध्दी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, केसरकर राजकारणात आल्यापासून २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण करत आहेत. अनेकवेळा त्यांनी आपल्या सडेतोड भूमिकेतून सत्याची बाजू उचलून धरली आहे. तीनवेळा आमदार व दोनदा मंत्रिपद प्राप्त झालेले हे व्यक्तिमत्व नेहमी जमिनीवरच राहिले. मोठ्या आविर्भाज्यात इतरांना कमी लेखण्याचा प्रकार त्यांच्या हातून घडला नाही. विकासकामे मंजूर करताना पक्षभेद केला नाही. सर्वांना समान न्याय देत ते सातत्याने मतदारसंघाची सेवा करत आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी या भागातील सुमारे २६०० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करून घेतली आहेत. त्यातील अनेक कामे पूर्णत्वासही आली आहेत. त्यांनी केलेला विकास मतदारसंघातील प्रत्येकाला माहित आहे. त्यामुळे काहीही न करणारी मंडळी केवळ आमदारकीचे स्वप्न पाहून बिनबुडाचे आरोप करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, जनता हुशार आहे. राजन तेली पराभवाची हॅट्रिक करतील. आमच्या मतदारसंघाचा विकास करायला केसरकर, खासदार नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, उदय सामंत आदींसारख्या बड्या नेते सक्षम आहेत, असेही मांजरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, केसरकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग या राज्यांत झालेल्या सामंजस्य करारानुसार सिंधुदुर्गची कौशल्यप्रधान मुलांची पहिली बॅच जर्मनीत रवाना होत आहे. या मुलांनी जर्मनीत जाण्यापूर्वी मंत्री केसरकर यांचे आशीर्वाद घेत ऋण व्यक्त केले. उपस्थित पालकांनी श्री. केसरकर यांचे आभार मानले. राज्यातून १५० मुले पहिल्या टप्प्यात जात असून, त्यातील २५ जळगावची तर उर्वरित मुले सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रवाना होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.