अवैध मद्याविरुद्ध जिल्ह्यात १३१ गुन्ह्यांची नोंद
११० संशयितांना अटक ; १ कोटी ३० लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री विरोधात १३१ गुन्ह्यांची नोंद केली आहे. यामध्ये ११० संशयितांना अटक केली आहे.
हातभट्टीची गावठी दारु ३३४९ लिटर, देशी मद्य ६६. ४२ बल्क लिटर, विदेशी मद्य ८२.२६ बल्क लिटर, गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्य ९७९५.९७ बल्क लिटर, रसायन ४१५०५ लिटर तसेच मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो, मोटार या दोन वाहनांसह एकूण १ कोटी ३० लाख ८३ हजार ९५ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली.
अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याकरिता या विभागाकडून ४ पथके नेमण्यात आली आहेत. जानेवारी २०२४ पासून आतापर्यत दारुबंदी कायद्यानुसार २८ प्रकरणात १६ लाख एवढ्या रक्कमेची चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे संशयितांकडून घेण्यात आली आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई-गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गांवरुन प्रवाशी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये याकरिता कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत अचानकपणे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुद्धची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.
---
गस्तीपथकांची महामार्गावर नजर
निवडणुकीच्या अनुषंगाने मद्याची तस्करी होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची गस्तीपथके कार्यरत आहे. आवश्यक ठिकाणी नाकाबंदीही करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.