गोवा-सोलापूर विमानसेवा डिसेंबरपासून
‘फ्लाय-९१’ची सेवा ः व्यापार, पर्यटनाला चालना शक्य
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ ः गोव्यात मुख्यालय असलेल्या ‘फ्लाय-९१’ या एअरलाईनतर्फे २३ डिसेंबरपासून मुंबई आणि सोलापूरला हवाई सेवा सुरू होत आहे. सोलापूर हे भारतातील महत्त्वाचा वस्त्रोद्योग आणि औद्योगिक केंद्र आहे. गोवा ते सोलापूर आणि सोलापूर-मुंबई अशी ही सेवा असेल. याचा फायदा सिंधुदुर्गातील पर्यटनवृद्धीसाठीही होणार आहे. संबंधित कंपनीने याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
भारतातील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये शेवटच्या टप्प्याची हवाई कनेक्टिव्हिटी पुरवण्याच्या दृष्टिकोनासह फ्लाय-९१ या भारतातील प्रादेशिक एअरलाईनने भारतातील महत्त्वाचा वस्त्रोद्योग आणि औद्योगिक केंद्र असलेले सोलापूर, मुंबई आणि गोवा ही शहरे जोडली गेली आहेत. फ्लाय-९१ एअरलाईनच्या या दोन नवीन थेट मार्गांची म्हणजेच गोवा-सोलापूर आणि मुंबई-सोलापूरची घोषणा अलीकडेच केली आहे.
फ्लाय-९१ च्या वतीने येत्या २३ डिसेंबरपासून या दोन मार्गांवर ही उड्डाणे सुरू होतील आणि लवकरच या मार्गांसाठी तिकिटे उपलब्ध होतील. यामुळे या ठिकाणांदरम्यान जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची व्यवस्था उपलब्ध होईल. या दोन नवीन थेट मार्गांच्या घोषणेमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे एअरलाईनचे उद्दिष्ट अधोरेखित झाले आहे. हे केंद्राच्या उडान योजनेशी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश दुर्लक्षित आणि दुर्गम भागांमधील हवाई प्रवासाची उपलब्धता वाढवणे हा आहे, असे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मनोज चाको यांनी सांगितले. मुंबई आणि वस्त्रोद्योग आणि औद्योगिक केंद्र तसेच तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे सोलापूर यांच्यात थेट कनेक्टिव्हिटी पुरवणारी ‘फ्लाय-९१’ ही एकमेव एअरलाईन असून, गोव्याशी जोडणीमुळे सोलापूरच्या रहिवाशांसाठी गोव्याला सहज पर्यटनस्थळ म्हणून पोहोचता येईल, असे श्री. चाको म्हणाले. या दोन नवीन मार्गांवर फ्लाय-९१ ऑपरेशन्स सुरू झाल्याने व्यापार आणि पर्यटनात वाढ होईल, असेही त्यांनी नमूद केले.
---
प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी...
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, (मोपा) गोवा येथे स्थित असलेली फ्लाय-९१ एअरलाईन सध्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग आणि सोलापूर तसेच लक्षद्वीपमधील अगत्ती आणि बंगळुरू व हैदराबादसारख्या शहरांना जोडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत, फ्लाय-९१ एअरलाईन सोलापूर आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हवाई सेवा पुरवणारी पहिली आणि एकमेव एअरलाईन बनली आहे, ज्यामुळे व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे फ्लाय-९१ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.