पशुगणनेसाठी प्रगणक,
पर्यवेक्षक नियुक्त
रत्नागिरी ः केंद्र शासनाच्या आदेशानुसार पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात या मोहिमेला सुरवात झाली असून, २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात १८३ प्रगणक व ४० पर्यवेक्षकांमार्फत ही गणना सुरू आहे. या मोहिमेचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रामचंद्र नरूटे, डॉ. रोहित रानभरे, डॉ. आदिती कसारकर, डॉ. सुचिता शिंदे, विलास लोकरे, निकिता पवार आदी उपस्थित होते. २१वी पशुगणना करण्याकरिता ग्रामीण भागात ३ हजार कुटुंबांमागे एक प्रगणक आणि पाच प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक तसेच शहरी भागात ४ हजार कुटुंबांमागे एक प्रगणक आणि १० प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागासाठी १८३ प्रगणक व ४० पर्यवेक्षकांमार्फत ही गणना सुरू आहे. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. पशुसंवर्धन विभागाची ध्येयधोरणे ठरवणे. दूध, अंडी, मांस आदींच्या उत्पादनामुळे पोषण सुरक्षेसोबत ग्रामीण उपजीविकेलाही चालना मिळते.
-----
‘अॅग्रीस्टॅक’ योजनेची
१५ पासून अंमलबजावणी
रत्नागिरीः येत्या १५ डिसेंबरपासून प्रत्येक गावात तलाठी घरोघरी जाऊन ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेची अंमलबजावणी करणार आहेत. भूमिअभिलेख विभाग अॅग्रीस्टॅक ही योजना कृषी विभागाच्या मदतीने राबवणार आहे. त्यात शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार केले जाणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव, त्याच्या जमिनीची माहिती व आधार क्रमांक जोडला जाणार आहे. त्यातून शेतकऱ्यांची संख्या, त्यांच्याकडील जमिनीचे नेमके क्षेत्र कळू शकणार आहे; मात्र त्यासोबतच अधिकार अभिलेखांनाही आधार जोडणी करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाने केंद्र सरकारकडे दिला होता. त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
--------
कुंभार युवा आघाडीतर्फे
समाजोपयोगी उपक्रम
रत्नागिरीः जिल्हा कुंभार समाज युवा आघाडीतर्फे समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. खेर्डी-चिपळूण येथील संत गोरा कुंभार सभागृहात ही सभा झाली. कुंभार समाजाच्या विकासाच्या, संघटनेच्यादृष्टीने पूरक विषयांवर चर्चा झाली. समाजातील यशस्वी व्यावसायिक व त्यांची यशोगाथा यातून नवीन तरुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी व्यावसायिक स्नेहसंमेलन घेण्याबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर घेण्याचा निर्धार करण्यात आला. जिल्ह्यातील तरुण एकत्र येऊन संघटन बांधणी व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्हा मर्यादित केपीएल क्रिकेट स्पर्धा नियोजन करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात प्रत्येक तालुक्यामध्ये गावभेट दौरा करून त्या ठिकाणी समाजबांधव पदाधिकाऱ्यांजवळ या व्यावसायिक स्नेहसंमेलन व इतर उपक्रम यावर चर्चा करण्यात येणार आहे. सभेला जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, जिल्हा सचिव प्रकाश साळवी, रवींद्र शिरकर, नाना पालकर, नीलेश कुंभार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.