29280
माझा संघर्ष यापुढेही सुरूच
वैभव नाईकः लोकांचा निर्णय मी स्विकारला
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ः विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव मी स्वीकारला आहे. लोकशाहीमध्ये लोकांनी जो निर्णय घेतला तोही स्वीकारला पाहिजे. लोकशाहीमध्ये दोन वेळा आमदार बनवण्याचे काम लोकांनी केले तर यावेळी पराभूत केले. तो निर्णय आपण सर्वांनी स्वीकारून पुढे जायला पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मला सर्वांचे चांगले सहकार्य लाभले. माझा हा संघर्षाचा प्रवास यापुढेही सुरू राहील. यासाठी तुमच्या सर्वांची साथ मला आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी आज कुंभारमाठ येथे केले.
कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे ठाकरे शिवसेना पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी संजय पडते, मंदार केणी, हरी खोबरेकर, यतीन खोत, दीपा शिंदे, श्वेता सावंत, पूनम चव्हाण, नितीन वाळके, बाबी जोगी, महेश जावकर, मंगेश टेमकर, मंदार गावडे, मंदार ओरसकर, उदय दुखंडे, यशवंत गावकर, बाळ महाभोज, उमेश मांजरेकर, विनायक परब, सिध्देश मांजरेकर, अमित भोगले, बाबा सावंत, संजय गावडे, उमेश चव्हाण, निनाक्षी शिंदे, आर्या गावकर ,सोनाली डिचवलकर, अन्वय प्रभू, भारती आडकर, स्नेहा शेलटकर, दत्ता पोईपकर उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले, "पराभवानंतर माझा आवाज कमी नाही तर वाढेलच. आजची बैठक पराभवाची, चिंतनाची नाही तर आपल्याला आता नव्याने सुरवात करायची आहे. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कडवी झुंज दिली. आपापल्या विभागात तोडीस तोड काम केले. त्यामुळे त्या सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानत आहे. खरंतर लढाईचा कधीही शेवट होत नसतो तर नव्याने लढाई सुरु होत असते. तुम्हाला, मला संघर्ष काही नवीन नाही. आपण सर्वजण संघर्षातून इथपर्यंत पोचलो आहोत. त्यामुळेच लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला. पराभवानंतरही जो काही मला प्रतिसाद दिलात तो पाहुन भारवलो. मी सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधी होतो याची जाणीव मला आहे. ७३ हजार मतदार तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे यापुढील काळातही काम करावेच लागेल."
ते पुढे म्हणाले, "जे चुकीचे काम करतील, त्यांना रोखण्याबरोबर आपण सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी रहायला हवे. चुकीच्या भूमिका लोकांवर लादल्या जात असतील तर त्याला विरोध केला पाहिजे. हा विरोध आपल्या सर्वाना यापुढील काळात करावा लागणार आहे. शिवसेना हा पक्ष छोट्या भूमिका घेऊन मोठा झालेला पक्ष आहे. आमच्याबरोबर कोण ठेकेदार, काळा व्यवसाय करणारे नाहीत. त्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही. आपल्यासोबत आहेत ते प्रामाणिक, कष्ट करणारी माणसे आहेत. आपण एकत्र असलो की कोणीही त्रास देऊ शकत नाही. येणाऱ्या काळात सर्वाना एकत्र रहायचे आहे. ऐकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे आहे. कोणावर अन्याय होत असेल तर त्याच्या पाठीशी रहायचे आहे. येत्या काळात होणाऱ्या निवडणुकासाठी सज्ज रहायला हवे."
ते पुढे म्हणाले, "आज विरोधक आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पण, आपण ठाम रहायला हवे. कारण भविष्यात आपल्याला चांगले काम करायचे आहे. आमदार असलो किंवा नसलो तरी सर्वसामान्य जनतेसाठी जे जे काही करणे शक्य आहे ते निश्चित करणार आहे. ज्या ज्यावेळी बोलवाल, जेव्हा अन्याय होईल त्यावेळी मी कायम जनतेसोबत असेन. ज्या लोकांनी मला मतदान केले, त्यांच्या विश्वासाला पात्र रहायला हवे ही माझ्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही जबाबदारी आहे. त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवे तरच आपले हे कुटुंब टिकणार आहे. जोपर्यंत आपल्याला संघर्ष करायचा आहे, तोपर्यंत तो करत राहूया."
यावेळी संजय पडते, नितीन वाळके, हरी खोबरेकर, मंदार केणी, महेश जावकर, पूनम चव्हाण यांनी आपले विचार मांडले.
चौकट
७३ हजार लोक माझ्या पाठीशी
येत्या काळात चुकीचे काम करत असतील तर त्याविरोधात आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल. यात अधिकाऱ्यांनीही ही गोष्ट लक्षात ठेवावी की ७३ हजार लोक माझ्या पाठीशी आहेत. हजारो शिवसैनिक पाठीशी आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी योग्य असेल तीच भूमिका घ्यावी. लोकशाहीला धरून कायदेशीर भूमिका घ्या; अन्यथा आम्ही एकत्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.