नेरुर येथे आजपासून
तालुका विज्ञान प्रदर्शन
कुडाळः तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १२ व १३ डिसेंबरला नेरुर येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर येथे आयोजित केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या (ता. १२) ला सकाळी ११ वाजता आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी कुडाळचे बीडीओ वासुदेव नाईक आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती करमळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, नेरुर ग्रामसेवा मंडळाचे (मुंबई) अध्यक्ष कमलाकर नाईक, शाळा समिती अध्यक्ष प्रदीप नाईक व नेरुरच्या सरपंच भक्ती घाडी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ वाजता वितरण वैज्ञानिक प्रतिकृती मांडणी, ११ वाजता उद्घाटन, दुपारी १२.३० वाजता सर्व गटातील वक्तृत्व, निबंध स्पर्धा होईल. शुक्रवारी (ता. १३) सकाळी ९ पासून वैज्ञानिक व शैक्षणिक प्रतिकृती परीक्षण, १० वाजता प्रश्नमंजुषा स्पर्धा (प्राथमिक व माध्यमिक गट), सायंकाळी ४ वाजता बक्षीस वितरण होईल. अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी नीलिमा नाईक (योजना), प्रमुख पाहुणे संस्था खजिनदार अनिल नाईक, सदस्य विजय नाईक, भास्कर नाईक उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापिका सुनीता नाईक व गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी केले आहे.
---------------
''सेवानिवृत्त शिक्षकांच्या
आंदोलनास पूर्ण पाठिंबा''
ओरोसः सेवानिवृत्त शिक्षकांच्या उद्या (ता. १२) होणाऱ्या आंदोलनाला सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गचा जाहीर पाठिंबा असून, या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या सुध्दा अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्याचा सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यातील प्रमुख मागणी सेवानिवृत्तांची पेन्शन १ किंवा २ तारीखला होणे अत्यंत आवश्यक असतानाही त्याकडे प्रशासन गांभीर्याने बघत नाही. म्हणून प्रशासनाचा या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाने सेवा निवृत्त शिक्षक संघटनेच्या आंदोलनास पुर्ण पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचे कार्यकारिणी सदस्य आंदोलनात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचे अध्यक्ष प्रकाश राणे, उपाध्यक्ष हनुमंत प्रभू, सचिव प्रकाश बाबाजी राणे यांनी दिली.
............
दाणोलीत आज
हरिनाम सप्ताह
ओटवणेः दाणोली येथील समर्थ सद्गुरू साटम महाराज समाधी मंदिरात उद्या (ता. १२) अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सात प्रहराच्या या सप्ताहाची सांगता शुक्रवारी (ता. १३) दुपारी महाप्रसाद कार्यक्रमाने होणार आहे. ''दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा'' या अखंड दत्तनाम सप्ताहाला उद्या सकाळी ११ वाजता विधिवत प्रारंभ होणार आहे. सांगता शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. नंतर सवाद्य पालखी सोहळा, दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
---------------
वेंगुर्लेत शनिवारी
दत्तजन्म सोहळा
वेंगुर्लेः दत्त जयंतीचे औचित्य साधून शनिवारी (ता. १४) येथील परुळेकर दत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेंगुर्ले शहरात राहून माध्यमिक व उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी परुळकरांच्या वाड्यावर विद्यार्थी वसतिगृहाचीही सोय केली होती. या वसतिगृहात राहून शिकून मोठे झालेले विद्यार्थी व परुळेकर कुटुंबियांचा स्नेहमेळावा हे यावर्षीच्या दत्त जयंती उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. सकाळी मंदिरातील धार्मिक विधीनंतर लगेचच या स्नेहसंमेलनाला प्रारंभ होणार आहे. दुपारी १२ वाजता ''भिक्षा प्रदक्षिणा'', सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. अरुण सावंत यांचे दत्त जन्मोत्सवाचे कीर्तन व नंतर दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचे ''मायाजाल'' नाटक होणार आहे. या सोहळ्याला वेंगुर्लेवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.
---------------
चराठा पावणाई
जत्रोत्सव आज
ओटवणेः चराठा येथील पावणाई व रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी (ता. १२) होणार आहे. नवसाला पावणारा रवळनाथ आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी पावणाईची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रमांनंतर पावणाई व रवळनाथाला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. नंतर पावणाईची मानाची ओटी भरल्यानंतर श्रींच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.