36892
प्रलंबित विकासकामे मार्गी लावा
मंत्री राणे : कणकवलीत अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. ६ : मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहावर मत्स्य व्यवसाय बंदरे विकास अधिकारी, देवगड-जमसंडे नळ पाणीपुरवठा योजना, राष्ट्रीय महामार्ग, बीएसएनएल नेटवर्क, आदी विकासकामांबाबत आढावा बैठक घेतली. कामांची गती कायम ठेवून विकासकामे प्रलंबित राहणार नाहीत, याची खबरदारी घ्या. निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही श्री. राणे यांनी दिली.
श्री. राणे यांनी मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त श्री. कुवेसकर यांच्यासह मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न वाढले पाहिजे. गस्तीसाठी लागणाऱ्या नौका तातडीने मिळवून देण्याचा प्रयत्न करू. मात्र, अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा चालणार नाही. प्रसंगी लागेल त्या मदतीसाठी अधिकाऱ्यांना पाठबळ देऊ, असे सांगितले. तसेच प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन श्री. मोगले यांच्याशीही संवाद साधून आढावा घेतला. देवगड-जामसंडे नळपाणी योजनेबाबत देवगडचे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्याशी संवाद साधून योजना सुरळीत सुरू करण्याबाबत चर्चा केली. त्यासाठी लागणारी मदतही आपल्याकडून होईल, अशी ग्वाहीही दिली. तसेच भुईबावडा घाटप्रश्नी राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता श्री. घाडगे यांच्याशी भुईबावडा घाट तसेच अन्य महामार्गाच्या बाबतीत चर्चा केली. जी काय अपूर्ण कामे असतील ती वेळीच मार्गी लावावी, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी केल्या.
---
मोबाईल नेटवर्क समस्येची दखल
दरम्यान, सर्वांत जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे मोबाईल नेटवर्क. याबाबतही श्री. राणे हे काही महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्याप काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. बीएसएनएल सिंधुदुर्गचे अधिकारी श्री. जानू यांच्याशी चर्चा केली. तसेच भुईबावडा, शिवापूर याठिकाणी असलेली मोबाईल नेटवर्कची समस्या तातडीने मार्गी लावा, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.