36971
केसरकर नेहमीप्रमाणे मतदारसंघातून गायब
रुपेश राऊळ ः पंधरा वर्षांमध्ये दिलेले शब्द पूर्ण करा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर हे नेहमीप्रमाणे निवडून आल्यानंतर मतदारसंघातून गायब झाले आहेत. कदाचित मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याने दिल्लीत की गल्लीत जाऊन बसले? हे शोधावे लागतील, असा टोला ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे लगावला. चौथ्यांदा केसरकर निवडून आले असल्याने त्यांनी पंधरा वर्षांमध्ये दिलेले शब्द पूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत. अन्यथा आपण नाराज असल्याने आपल्याला ते पूर्ण करता येणार नाही असे स्पष्ट जनतेला सांगावे, अशी टीकाही त्यांनी केली.
श्री. राऊळ यांनी येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. बाळू माळकर, निशांत तोरस्कर, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते. श्री. राऊळ पुढे म्हणाले, ‘‘सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर प्रशासनाचा अंकुश नसल्याचे दिसते. सावंतवाडी शहरामध्ये निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे काम होत आहे तर दुसरीकडे मळगाव घाटीमध्ये सुरू असलेले गॅस पाईपलाईनचे काम पाहता त्या ठिकाणी रस्त्यावर येणारी माती व त्या ठिकाणी अपघातसदृश परिस्थिती निर्माण होत असताना त्याकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. एकूणच सर्व परिस्थितीकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. प्रशासनावर कोणाचाच अंकुश नसल्याने हा प्रकार घडत आहे. मुळात या ठिकाणी निवडून आलेले आमदार नेहमीप्रमाणे गायब झाले आहेत. ते नाराज असल्याने दिल्लीत जाऊन लपले की कुठे? हे शोधावे लागेल.
दुसरीकडे जिल्ह्यातील मंत्री नीतेश राणे हे ज्याप्रमाणे जिल्ह्यात मंत्रिपद घेऊन आले आणि त्यांनी गाजावाजा करून स्वतःचे केलेले स्वागत पाहता त्यांनी मंत्रिपद जिल्ह्यात घेऊन येत असताना शेतकऱ्यांसाठी काहीतरी घेऊन आले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. गेल्या सहा महिन्यांपासून येथील शेतकरी बागायतदार फळपीक योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या ठिकाणी राज्याचा हिस्सा मिळत नसल्याने शेतकरी लाभापासून वंचित असल्याचे समोर आले. त्यामुळे मंत्री राणे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे काहीतरी केले असते तर आम्ही निश्चितच आनंद व्यक्त केला असता. दुसरीकडे केसरकर यांनीही पंधरा वर्षांमध्ये जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आता तरी प्रयत्न करावेत, अन्यथा त्यांनी आपण नाराज असल्याने आपल्याला जनतेला दिलेला शब्द पूर्ण करता येणार नसल्याचे स्पष्ट करावे.’’
----
‘पक्षामध्ये कसलीच नाराजी नाही’
श्री. राऊळ पुढे म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टीने काम करत आहोत. पराभवाचे आत्मचिंतन करण्याची आम्हाला गरज नाही. मुळात एखादा नवीन चेहरा उमेदवार म्हणून द्यायचा असल्यास तो किमान सहा महिने आधी पक्षामध्ये कार्यरत असणे गरजेचे आहे. पक्षामध्ये कुठेही नाराजी नाही.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.