39594
करूळ घाट सुरू न केल्यास आंदोलन
ठाकरे शिवसेनेचा इशाराः जानेवारी अखेरपर्यंत डेडलाईन
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १८ः ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज केवळ करूळ घाटरस्त्यांची पाहणी केली; मात्र घोषणेप्रमाणे आंदोलन केले नाही आणि घाट वाहतुकीचा प्रारंभही केला नाही. जानेवारी अखेरपर्यंत घाटरस्ता सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
करूळ घाट गेले वर्षभर बंद असल्यामुळे येथील व्यापारी, वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी १७ जानेवारीला घाट वाहतूक सुरू न केल्यास आम्ही वाहतुकीचा प्रारंभ करू, असा इशारा दिला होता. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, सुशांत नाईक, मंगेश लोके, नंदू शिंदे, स्वप्नील धुरी, मनोज सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते करूळ तपासणी नाक्यावर पोहोचले. तेथे बॅरिकेटस लावून वाहतूक बंद केली होती. पोलिसांचा बंदोबस्तही होता. माजी आमदार नाईक यांनी आम्हाला बघून बॅरिकेटस का लावले? तुम्ही जिल्हा विकत घेतलाय का? असा प्रश्न कंपनीच्या कर्मचाऱ्यांना केला. बॅरिकेटस बाजूला करा, असे त्यांनी सुनावताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बॅरिकेटस बाजूला केले.
त्यानंतर शिवसेना पदाधिकारी घाटरस्त्याची पाहणी केली. नाईक आणि तेली यांनी जिल्हाधिकारी आणि महामार्ग प्रधिकरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. करूळ घाटरस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे एकेरी वाहतूक या मार्गावरून सुरू करा, असे सांगितले.
यासंदर्भात सोमवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवा, असे देखील सुचित केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जानेवारी अखेरपर्यंत करूळ घाटरस्ता वाहतूक सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करू, असा इशारा दिला. रस्ता बंद असल्यामुळे जनतेचे हाल झाले आहेत. या मार्गाने वाहतूक बंद असल्यामुळे पर्यटकांचा ओेढा थांबला आहे. त्यामुळे व्यावसायिक आर्थिक संकटात आले आहेत. तातडीने या मार्गावरून वाहतुक सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
चौकट
आंदोलनाचा फुसका बार
ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु त्यांनी आज कोणतेही आंदोलन केले नाही. केवळ घाटरस्ता पाहणी करून माघारी परतले. रस्ता वाहतुकीचाही प्रारंभ करणार होते; मात्र यापैकी काहीच न केल्याने तालुक्यात चर्चा होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.