आयएनएस ‘गुलदार’ विजयदुर्गात आणणार?
हालचाली सुरू; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पाऊल
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ ः भारतीय नौदलाची आयएनएस ‘गुलदार’ ही निवृत्त युद्धनौका तालुक्यातील विजयदुर्ग खाडीत आणण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ही नौका कारवार नौदल तळ (जि. उत्तर कानडा) ते विजयदुर्ग बंदर येथे आणण्याकरिता संस्थेची नेमणूक करण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. ही युद्धनौका मराठा आरमाराचे मुख्य ठिकाण असलेल्या किल्ले विजयदुर्गच्या परिसरात उभी राहिल्यास असंख्य पर्यटकांची पाऊले इकडे वळतील आणि स्थानिकांना यातून रोजगार प्राप्त होऊ शकेल याअनुषंगाने किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने पालकमंत्री नीतेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले होते.
किल्ले विजयदुर्गला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देतात. त्यामुळे विजयदुर्गला येणार्या पर्यटकांसाठी भारतीय नौदलाची आयएनएस ‘गुलदार’ ही निवृत्त युद्धनौका विजयदुर्ग खाडीत आणल्यास त्याचा मोठा लाभ होऊ शकेल याकडे किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने पालकमंत्री राणे यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदनात, सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे आरमार बांधणीचा कारखाना उभा करून त्यामध्ये आरमारी युद्धनितीसाठी महाकाय गलबते, पडाव, पालव, गुराब, मचवा अशा असंख्य प्रकारच्या युद्धनौका बांधल्या. या आरमारासाठी अत्यंत सुरक्षित अशा किल्ले विजयदुर्गच्या बाजूस पसरलेल्या वाघोटण खाडीची निश्चिती करण्यात आली. ही खाडी सुमारे ४२ किलोमीटर इतक्या लांबीची आणि ४० ते ५० मीटर खोल आहे. नागमोडी वळण आणि खाडीच्या दुतर्फा डोंगर असलेली अशी सुरक्षित खाडी कोणत्याही वादळ वार्यापासून नौकांना सुरक्षित असलेले आणि आरमारी गनिमी काव्यासाठी मोक्याचे ठिकाण मानले जात होते. छत्रपती शिवरायांनी आदिलशाहीकडून लिलया काबीज केलेला आणि पुढे सरखेल कान्होजी आंग्रेसह तुळाजी आंग्रेपर्यंत तब्बल १०५ वर्षे मराठ्यांच्या अधिसत्तेत असलेला किल्ले विजयदुर्ग आणि त्याचे आरमारी साम्राज्य इतिहासाच्या पानांवर अधोरेखित आहे. २००५ मध्ये किल्ले विजयदुर्गचा अष्टशताब्दी वर्ष महोत्सव दिमाखाने साजरा झाला होता. तद्नंतर इथे पर्यटकांचा ओघही मोठ्या संख्येने वाढला. विजयदुर्ग किल्ला आणि इथल्या दशक्रोशीतील ग्रामस्थ पर्यटनाच्या सोयीसुविधांनी नेहमीच उपेक्षित राहिले आहेत. विजयदुर्ग किल्ल्यास भेट द्यायला येणार्या पर्यटकांसाठी काही पर्यटनात्मक प्रकल्प येणे अत्यंत आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून नौदलाची आयएनएस गुलदार ही युद्धनौका मराठा आरमाराचे मुख्य ठाणे असलेल्या किल्ले विजयदुर्गच्या सभोवती उभी राहिल्यास असंख्य पर्यटकांची पाऊले इकडे वळतील आणि विजयदुर्गसह तालुक्यातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही प्राप्त होईल. किल्ले विजयदुर्गचे ऐतिहासिक आरमारी साम्राज्य याचे महत्व लक्षात घेऊन याकामी लक्ष घालून असंख्य विजयदुर्गवासियांची अपेक्षापूर्ती करावी असे श्री. राणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आता या मागणीला यश येताना दिसत आहे. दरम्यान, ही निवृत्त युद्धनौका विजयदुर्ग खाडीत आणण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ही नौका कारवार नौदल तळ ते विजयदुर्ग बंदर येथे आणण्याकरिता संस्थेची नेमणूक करण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात ही युध्दनौका विजयदुर्ग भागात येऊन पर्यटकांसाठी पर्वणी ठरण्याची शक्यता आहे.
...................................
पर्यटनास चालना
आयएनएस ‘गुलदार’ ही निवृत्त युद्धनौका किल्ले विजयदुर्ग परिसरात आणण्याची मागणी झाली. यामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होऊ शकेल याकडे लक्ष वेधण्यात आले होते. किल्ले विजयदुर्ग पहाण्यासाठी पर्यटक येतात. भविष्यात ही युद्धनौका विजयदुर्ग परिसरात आल्यास पर्यटकांची पावले विजयदुर्गमध्ये स्थिरावतील. यामुळे स्थानिक व्यवसायाला बळकटी येण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
......................................
कोट
46130
किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीमार्फत दिलेल्या ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौका पर्यटकांसाठी विजयदुर्ग बंदरात उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास पालकमंत्री नीतेश राणे यांनी गती दिली. याबद्दल समस्त विजयदुर्गवासी आणि समितीकडून श्री. राणे यांचे मनापासून आभार. या युद्धनौकेमुळे स्थानिक पर्यटन वृद्धीसाठी मोठी मदत होणार आहे.
- राजीव वसंत परुळेकर, संस्थापक अध्यक्ष, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.