फणसवळे-कोंडवाडीत भरदिवसा घरफोडी
चोरट्याने मारला १५ तोळे सोन्यासह २९ हजारांवर डल्ला
रत्नागिरी, ता. १८ : तालुक्यातील फणसवळे येथे भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने १५ तोळे सोन्यासह २९ हजार ५०० रुपये पळविले. हा प्रकार कोंडवाडी येथे घडला.
रत्नागिरीत चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. आंब्याच्या बागेसह शेतात मजुरीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांची घरे हेरून घरफोडी केली जात आहे. फणसवळे - कोंडवाडी येथे असाच प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरूप सोनू माने हे फणसवळे-कोंडवाडी येथे राहतात. त्यांची पत्नी मनाली व मुलगा रोहन आणि त्यांची मुलगी असे एकत्र राहतात. मंगळवारी (ता. १८) सकाळी सर्व जण कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. मुलगा एमआयडीसीत, तर स्वरूप माने हे मजुरीसाठी बाहेर गेले होते. त्यांची पत्नी शेतात कामाला गेली होती. रस्त्यालगतच असलेले माने यांचे घर बंद होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूने आतमध्ये प्रवेश केला. एका खोलीतील कपाट त्याने उघडले. आतील कपड्यांसह सर्व वस्तू अस्ताव्यस्त करत तपासणी केली. मात्र, त्या कपाटात त्याच्या हाती काहीच लागले नाही. स्वरूप यांच्या पत्नीने घरातील सर्व दागिने आणि मोलमजुरी करून कमावलेली पुंजी एका लोखंडी ट्रंकमध्ये दडवून ठेवली होती. या ट्रंकवर चोरट्याची नजर पडली. अज्ञात चोरट्याने घरातील कोयतीनेच ट्रंक फोडला. त्याचवेळी तेथे असलेली एक सुटकेसदेखील त्या चोरट्याने फोडली. त्या ट्रंकमध्ये असलेले १५ तोळे सोन्याचे दागिने आणि २९ हजार ५०० रुपये चोरून नेले.
स्वरूप यांची पत्नी मनाली ही दुपारी एकच्या सुमारास घरी आली. यावेळी तिने त्या खोलीकडे पाहिले असता खोलीत सर्व कपडे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. मनाली हिने लगेचच आरडाओरड सुरू केला. तिच्या आवाजाने शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी तत्काळ ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून त्यांनी मनाली यांची तक्रार दाखल करून घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.