50150
महिलांची प्रगतीच्या दिशेने वाटचाल
डॉ. विजयालक्ष्मी चिंडक-पाटील ः सावंतवाडीत बौद्ध महासभेतर्फे महिला दिन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः ‘जगातील महिलांना आपल्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन करावे लागले; मात्र भारतीय महिलांना संविधानानेच हे हक्क दिल्याने त्यांना सर्व क्षेत्रे खुली झाली आहेत. म्हणूनच भारतातील स्त्रिया रिक्षाचालक ते वैमानिक अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. सर्वच क्षेत्रे महिलांनी व्यापल्याने महिलांनी आता केवळ लघू नव्हे तर भविष्याचा वेध घेत आपल्या प्रगतीसाठी दूरदृष्टीने वाटचाल करावी,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विजयालक्ष्मी चिंडक-पाटील यांनी येथे केले.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे येथील कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात शनिवारी (ता. ८) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित महिला मेळाव्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला अध्यक्ष प्रा. सुषमा विजय हरकुळकर होत्या. विचारपीठावर जिल्हा संघटक तथा जिल्ह्यातील नामांकित कवी जनीकुमार कांबळे, समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष विजय कदम, सावंतवाडी अध्यक्ष विजय नेमळेकर, महिला अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर, रवीना कांबळे, करुणा कदम, कौंडल्य पवार, चंद्रशेखर जाधव, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाल्या, ‘‘जगातील महिलांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागला; मात्र भारतीय महिला त्याला अपवाद असून, त्यांना संविधानानेच सर्व स्वातंत्र्य बहाल केल्याने स्वातंत्र्य व समता आपोआपच मिळाली. या स्वातंत्र्यामुळेच महिलांनी विविध विकासाचे टप्पे पार केले. उदारीकरण धोरण सुरू झाल्यानंतर सर्वच क्षेत्रांत स्पर्धा सुरू झाली. यासाठी स्त्रियांमधील सुंदरी स्पर्धेचे उदाहरणही देता येईल. दूरदर्शनमधील फसव्या मालिका, जाहिरातींपासून दूर राहून महिलांमधील भेदाभेद महिलांनीच संपवायला हवेत.’’
प्रा. हरकुळकर म्हणाल्या, ‘माणसाची प्रगती म्हणजे राहणीमान नसून धम्म संस्कार आत्मसात केल्यानेच खरी धार्मिक प्रगती होते. महिलांनी याबाबत पुढाकार घ्यावा व धार्मिक संस्कार करावेत. महिलांचे संघटन ही प्रगतीची सुरुवात आहे. महिला जेव्हा संघटित होतात, तेव्हा चळवळसुद्धा सक्रिय होते, म्हणून महिलांनी धर्म चळवळीत सक्रिय व्हावे.’ ममता जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रतिभा जाधव यांनी आभार मानले. मानसी कदम, अश्विनी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मोहन जाधव यांनी परिचय केला.
---
बौद्ध विहारासाठी ठराव
यावेळी सत्यवती कदम (सांगली,) सुहासिनी तेंडुलकर (बांदा), सविता कदम (सांगेली), मीनाक्षी पवार (सावंतवाडी), जयश्री पाटणकर (सावंतवाडी), सुमित्रा जाधव (किनळे), रूपाली जाधव (इन्सुली), अर्चना शेर्लेकर (इन्सुली), सुचिता जाधव (मळगाव), कल्पना जाधव (कुणकेरी) अशा ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांचा गौरव झाला. यावेळी बौद्ध विहार सावंतवाडीत व्हावे व बुद्धगया क्षेत्र मुक्त व्हावे, असा ठराव मंजूर करण्यात आला. दुपारच्या सत्रात महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.