तीन बैल चोरणारे
चौघे गजाआड
खेडः घेरारसाळगड परिसरातील गुरे रायगड जिल्ह्यातील ओंबळी भागातील जंगलात चरत असताना त्यातील ३ बैलांची चोरी करणाऱ्या चौघांच्या पोलादपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किंमतीचे तीन बैलही हस्तगत करण्यात आले. याबाबत शरद तुकाराम गायकर (रा. घेरारसाळगड-गवळवाडी) यांनी पोलादपूर पोलिसात तक्रार नोंदवली होती. मासूम अजीम तालघरकर (वय २४), मुरशद उस्मान कोर्डेकर (६२), मुकेश पांडुरंग सकपाळ (४०, तिघेही रा. शिरवली-महाड), शब्बीर उस्मान जोगिलकर (३८, रा. कापडे बु. पोलादपूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. शरद गायकर यांच्या मालकीचे तीन बैल २५ ते २६ मार्चदरम्यान ओंबळी येथील जंगलात चरण्यासाठी सोडले होते. या तिन्ही बैलांची संशयितांनी चोरी केल्याची गोपनीय माहिती पोलादपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलादपूर पोलिसाचे पोलिस निरीक्षक अनिल जाधव व पोलिस हवालदार सुतार व सहकाऱ्यांनी सापळा रचून चौघांना जेरबंद केले. ७५ हजार रुपये किंमतीचे ३ बैल पोलादपूर पोलिसांनी ताब्यात घेतले.
--------
युवतीचा विनयभंग,
दोघे अटकेत
खेडः तालुक्यातील एका गावातील युवतीचा विनयभंग करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी रोशन धोत्रे (वय २८), सूरज सुरेश पाटील (वय १८) या दोघांना येथील पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. दोघांनाही गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता संशयिताची न्यायालयीन कोठडीत परवानगी करण्यात आली. ही घटना फेब्रुवारी २०२४ पासून आजतागायत घडल्याचे पीडित युवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
------------------------
निगडेनजीक मोटार
जळून खाक
खेडः मुंबई-गोवा महामार्गावरील निगडेनजीक गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास दापोली तालुक्यातील मुरूड येथून कवठेमहांकाळ येथे जाणारी मोटार जळून भस्मसात झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने त्याच्यासह अन्य दोघेजण बालंबाल बचावले. अपघाताची माहिती मिळताच चिपळूण महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. चालक शुभम बापूसाहेब साबळे (२९, रा. कवठेमहांकाळ, सांगली) हे मोटारीतून (एमएच-१०-एजी-२०६६) आकाश जगन्नाथ शिंदे, रेश्मा प्रकाश शिंदे (दोघेही रा. मुरूड-दापोली) यांना घेऊन मुरूड येथून कवठेमहांकाळ येथे जात होते. भोस्ते घाट चढून कार निगडेनजीक आली असता मोटारीच्या इंजिनमधून धूर आला. ही बाब चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने मोटार रस्त्यालगत थांबवत दोघांनाही बाहेर पडण्यास सांगितले. मोटारीतील साहित्यही बाहेर काढले. काही क्षणातच आगीचा भडका उडून मोटार जळून भस्मसात झाली.
........
दळेत घरफोडीत
६० हजाराचा मुद्देमाल चोरीस
राजापूर ः तालुक्यातील दळे, सडेवाडी येथे वास्तव्याला असलेले सेवानिवृत्त शिक्षक यात्रेनिमित्त आपल्या मुळ गावी गेलेले असताना बंद असलेले घर फोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम अशा सुमारे ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी आनंदा महादेव मोरे यांनी नाटे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दळे, सडेवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक आनंदा मोरे १३ मार्चला आपल्या कुटुंबासह त्यांच्या मुळ गावी म्हणजे गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथे यात्रेनिमित्त गेले होते. २५ मार्चला यात्रा संपवून दळे, सडेवाडी येथील घरी परतले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. देवघरात असलेले लोखंडी कपाट उचकटून त्यातील सोन्याची अंगठी व रोख रक्कम तसेच बेडरूमधील शोकेस कपाटातील पर्समधून रोख रक्कम चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी आनंदा मोरे यांच्या घरातील सुमारे ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.