‘ई पॉस’ला ‘एरर’, धान्य वितरण होईना
कुडाळात संघटना संतप्त; मशीन जमा करण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः शिधापत्रिका धारकांना धान्य वितरण करताना ई-पॉस मशीनला येत असलेल्या व्यत्ययामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ३० एप्रिलपर्यंत यामध्ये सुधार न झाल्यास १ मेस सर्व ई-पॉस मशीन येथील तहसील कार्यालयात जमा करण्याचा इशारा कुडाळ तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेचे अध्यक्ष उमेश धुरी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन पुणे संलग्न रास्त भाव धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटना, तालुका कुडाळातर्फे आज जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, लाभार्थी शिधापत्रिका धारकांना ई-पॉस मशीनद्वारे दरमहा धान्य वितरण करण्यात येते. मात्र, ते वितरण करताना ‘एनआयसी’ व ‘ओयासीस’च्या माध्यमातून वेगवेगळे ‘एरर’ येत आहेत.
----
वरिष्ठांना कळवूनही दुर्लक्ष
मशीन लॉग-आऊट होणे, मशीनला धान्य झीरो दाखवणे, प्रत्येक दुकानात वेगवेगळे ‘एरर’ येणे अशा प्रकारचे वेगवेगळे एरर मशीनला सातत्याने येत आहेत. संबंधित समस्येबाबत शासकीय ग्रुपवर माहिती दिली असता समर्पक उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे लाभार्थींना तास न् तास धान्यासाठी ताटकळत राहावे लागते व दिवसा अखेर विनाधान्याचे परत जावे लागते. यामुळे शिधापत्रिकाधारक व परवानाधारक यांच्यात वाद होण्याचे प्रसंग उद्भवतात. गेले कित्येक महिने या संदर्भात वरिष्ठ पातळीवर कळवून सुद्धा याबाबत काहीही उपाययोजना केलेली दिसत नाही.
---
३० एप्रिलची डेडलाईन
दरमहा याच समस्या येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन धान्य वितरण करणे अवघड बनले आहे. परवानाधारकाची काही चूक नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. तरी याबाबत ३० एप्रिलपर्यंत समस्यांमध्ये सुधारणा न झाल्यास १ मेस सर्व ई-पॉस मशीन कुडाळ तहसीलदार कार्यालयात जमा कराव्या लागतील, असा इशारा कुडाळ तालुका सर्व रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे अध्यक्ष धुरी व सचिव संतोष सावंत यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.