शासन-उद्योजकात
आज करार
रत्नागिरी ः उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (ता. ९) येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे. जिल्ह्यातील अनेक उद्योजक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनासोबत या वेळी सामंजस्य करार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी दिली. या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत उद्योगाशी संबंधित सर्व विभाग आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
----
एनएनएमएसमध्ये
सलोनी कांबळेचे यश
संगमेश्वर ः तालुक्यातील कोसुंब येथील श्री शिवाजी शिक्षण उत्तेजक मंडळ संचलित श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब शाळेतील विद्यार्थिनी सलोनी कांबळे हिने एनएनएमएस परीक्षेत यश मिळवले. डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी तालुक्यातून प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये कोसुंब हायस्कूलमधूनही विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यापैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी सलोनी हिने गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकावला आहे. दरमहा १००० रुपये याप्रमाणे चार वर्षाचे ४८ हजार असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन नामदेवराव जाधव, प्रशालेचे मुख्याध्यापक पी. डी. राऊत, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सलोनी व तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन केले.
-----
खल्वायनची संगीत
सभा शनिवारी
रत्नागिरी ः खल्वायन-रत्नागिरी या संस्थेची ३१२वी मासिक संगीत सभा येत्या शनिवारी (ता. १२) सायंकाळी सात ते नऊ या वेळेत शहरातील बसस्थानकसमोरील सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात गोवा येथील संगीत अलंकार गौरीश तळवलकर यांच्या शास्त्रीय तसेच अभंग, नाट्यगीतांनी रंगणार आहे. या मैफलीला हार्मोनियम गोपाल तळवलकर-गोवा तर तबला प्रथमेश शहाणे यांची साथसंगत लाभणार आहे. रसिकांसाठी प्रवेश विनामुल्य आहे. जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन खल्वायन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.