60010
रोजगारासाठीचे स्थलांतर थांबविणार
नीतेश राणे ः कुडाळ येथील ‘कॉफी विथ स्टुडन्ट’मध्ये ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः भविष्यात सिंधुदुर्ग हा विकसित जिल्हा म्हणून ओळखला जाईल. या ठिकाणच्या तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण जिल्ह्यातच मिळेल. या व्यवस्था एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून उभ्या करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या ‘कॉफी विथ स्टुडन्ट’ कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्री राणे यांच्या समवेत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कॉफी विथ स्टुडन्ट कार्यक्रमात संवाद साधला. या कार्यक्रमात पालकमंत्री राणे यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी पालकमंत्री राणे म्हणाले, ‘‘शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाची अट महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी रेशनकार्डसाठी असलेले रंग हे त्या योजनेसाठी पूरक ठरतात. त्यावरून उत्पन्न ठरते. आता काही लोक श्रीमंत असूनसुद्धा शासकीय योजनांचा लाभ घेतात, त्याला पर्याय नाही. यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लोकप्रतिनिधींसह समाजसेवकांनी पुढे येणे गरजेचे आहे. कोकण विभागात असे विद्यार्थी तयार होणे काळाची गरज आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी हे विद्यार्थी घडतात; पण कोकणात नाहीत, याची खंत वाटते. साक्षरतेत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. दहावी, बारावी परीक्षांचे निकाल देशात प्रथम असतात; पण स्पर्धा परीक्षांमध्ये आम्ही का कमी पडतो, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. वेंगुर्ले आणि कणकवली येथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू आहेत. याप्रकारे सर्वत्र सुरू होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
व्यासपीठावर बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट अध्यक्ष अदिती पै, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, अमृता गाळवणकर आदी उपस्थित होते.
----
जिल्ह्यात लवकरच मिनी बस
पालकमंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी बस महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या वेळा आणि छोट्या गावांमध्ये जाण्यासाठी मिनी बस यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच मिनी बस आपल्या जिल्ह्यात दाखल होतील. नर्सिंग विद्यार्थिनींसाठी पास मिळावा म्हणून परिवहनमंत्र्यांना विनंती करणार आहे. येथील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार मिळावा व त्यांनी आपल्या आई-वडिलांसोबत याच ठिकाणी राहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नर्सिंग क्षेत्रात काम करत असताना नर्सिंग पास झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.