६३१९०
केबल स्टे ब्रिजने सातारा जोडणार कोकणाला
रघुवीर घाटमार्गे महाबळेश्वरला जाणे सुलभ; पर्यटनाला मिळणार चालना
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १२ : कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पर्यटकांसह प्रवाशांना नवा जवळचा मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत आहे. हा पूल साताऱ्यातील तापोळा ते पलीकडे गाढवली आहिरपर्यंत होणार आहे. त्याच्याजवळच खेड तालुक्यातील रघुवीर घाटमार्ग आहे. या पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरचे अंतर सुमारे ५० किलोमीटरने कमी होईल. त्यामुळे सातारा ते रत्नागिरी हे दोन्ही जिल्हे जोडले जाणार आहेत. याच ब्रिजवर पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी उभी राहत असल्याने सह्याद्रीतील कोयनेचे बॅकवॉटर आणि अत्यंत मनोहरी दृश्य असलेल्या सनराइज् व सनसेटही पर्यंटकांना पाहता येईल.
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात प्रस्तावित असलेल्या या केबल स्टे ब्रिजला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात गती मिळाली. या पुलामुळे कोयना खोऱ्यातील दुर्गम भाग जोडला जाणार असून, खेड तालुक्यातील रघुवीर घाटमार्गे या पुलावरून सातारा व महाबळेश्वर असा प्रवास करता येईल. सुमारे १७५ कोटी रुपयांचा निधी या पुलासाठी मंजूर आहेत. मुंबईतील वरळी सी लिंकप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा स्वरूपाचा हा पहिलाच पूल आहे. ५४० मीटर लांबी व १४ मीटर रूंदीचा हा पूल असून, मध्यवर्ती भागात ४३ मीटर उंचीची पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी उभारली जाणार आहे. या गॅलरीत जाण्यासाठी कॅप्सूल लिफ्ट ठेवण्यात येणार आहे तसेच दोन्ही बाजूंनी जिन्याचे मार्गही असतील. या पूर्ण पुलाचे काम टी अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा आंबेनळी घाटमार्गाऐवजी नवा मार्ग प्रवाशांना खुला होईल. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटमार्गाने या नव्या ब्रिजवरून पलीकडे तापोळामार्गे महाबळेश्वर व थेट तापोळा कासमार्गे सातारा असा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे जवळपास पन्नास किमीचे अंतर कमी पडणार आहे. याच मार्गावर बामणोली ते आपटी हा आणखी एक पूल उभारला जात असून, त्यामुळे तापोळा ते सातारा हे अंतर दहा ते पंधरा किलोमीटरने कमी होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चौकट
पावसाळ्यात मिळणार पर्यायी मार्ग
सातारा जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव असलेलं दरे ते बामणोली कोयना खोऱ्यातील गाव जोडणारा ३०० कोटी रुपयांचा आणखी एक ब्रिज उभा राहात आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना, खांदाटी खोऱ्यात राहणाऱ्या नागरिकांनाही त्याचा उपयोग होईल. पावसाळ्यात या खोऱ्यातील नागरिकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क सुटतो, अशी परिस्थिती वारंवार निर्माण होते. या मोठ्या पुलांमुळे पावसाळ्याच्या दिवसात धोकादायक ठरणारा जीवघेणा कोयना बॅकवॉटरमधून बार्जमधील प्रवासही वाचणार आहे.
कोट
पूल उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या सगळ्या परवानग्या सहा महिन्यांपूर्वीच प्राप्त झाल्या आहेत. हे तीनही पूल उभारणीचे काम गतीने सुरू आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- अजय देशपांडे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाबळेश्वर
कोट
ब्रिजमुळे सातारा व रत्नागिरी हे दोन्ही जिल्हे जोडले जाणार आहेत. दरवर्षी पावसाळ्यात कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांचा संपर्क तुटतो; परंतु या ब्रिजमुळे खऱ्या अर्थाने येथील जीवनाला कलाटणी मिळाली. पर्यटनस्थळं संपर्कात येणार आहेत. त्याचा फायदा ग्रामस्थांना होईल.
- सदानंद मोरे, ग्रामस्थ, शिंदी वळवण
कोट
सह्याद्रीच्या पर्वतरांगातील कांदाटी खोरे हे कोयना अभयारण्याच्या बफरझोनमध्ये येते. हे खोरे निसर्गसंपन्न असून, निसर्गाची मुक्त उधळण या ठिकाणी पाहावयास मिळते. या ब्रिजमुळे पर्यटनाला निश्चितच चालना मिळणार आहे तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
- मंगेश पाटील, स्थानिक रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.