बीएसएनएलची सेवा कोलमडवण्याचे कारस्थान
टॉवरवर चढून फिरवले जाते युनिट; ठाकरे शिवसेना बैठकीत कंपनीकडून माहिती
दृष्टिक्षेपात....
* नवीन मंजूर टॉवर १८८
* बसवण्यात आलेले टॉवर १०६
* तक्रारी असलेले टॉवर ४२
राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : बीएसएनएल (भारतीय दूरसंचार निगम लि.) सेवा जाणीवपूर्वक कोलमडवण्याचे कारस्थान केले जात असल्याची भीती बीएसएनएलने व्यक्त केली. तालुक्यातील फणसवळे, दांडेआडोम भागामध्ये अशा प्रकारचा गंभीर प्रकार घडला आहे.
बीएसएनएलच्या टॉवरवर चढून काहीजण चुकीच्या दिनेशे युनिट फिरवून सेवा विस्कळित करत आहेत. असे कारस्थान सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. कालच्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत हा प्रकार कंपनीने सांगितला. बीएसएनएलच्या येथील ग्राहकांनी हा प्रकार उघड केला. केंद्रशासनाच्या बीएसएनएल कंपनीमुळे संवादक्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडली. मोबाईल आणि टेलिफोनवरील संवादामुळे लोक, नातेवाईक कितीही लांब असले तरी ती जवळ आली; परंतु या क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांनी शिरकाव केला आणि मोफत सेवेचे गाजर दाखवत या कंपन्यांनी पाय पसरले. बीएसएनएलच्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम झाला. त्यात केंद्र शासनानेदेखील या कंपनीला ऊर्जितावस्था देण्याच्यादृष्टीने गरजेच्यावेळी आर्थिक पाठबळ दिले नाही. त्यामुळे बीएसएनएल कंपनीला उतरती कळा लागली. त्यांचे ग्राहक हळुहळू जीओ, एअरटेल, आयडिया आदी खासगी कंपनीकडे वळले. बीएसएनएल कंपनी पुरती डबघाईला आली. ७० ते ८० टक्के कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
केंद्र शासनाने बीएसएनएला नवसंजीवनी देण्यासाठी फोरजी सेवा सुरू केली. याचा परिणाम खासगी कंपन्यावर होणार आहे. जिल्ह्यात बीएसएनएलचे १८८ नवीन टॉवर उभारले जात आहेत. त्यापैकी १०६ उभारले आहेत. उर्वरित लवकरच उभारले जाणार आहे; परंतु बीएसएनएलची सेवा कोलमडवून त्यांचे ग्राहक आपल्याकडे खेचण्याचे कारस्थान सुरू असल्याचे शिवसेनेच्या आढावा बैठकीत उघड झाले. रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे, दांडेआडोम येथील ग्राहकांच्या बीएसएनएलच्या सेवेबाबत कायम तक्रारी आहेत. वारंवार सुधारणा करूनही तिथे रेंज मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तिथे वॉच ठेवून एक गंभीर प्रकार उघडकीस आणला. बीएसएनएलच्या टॉवरवर चढून काहीजण त्यांचे युनिट चुकीच्या दिशेला फिरवतात. त्यामुळे गरजेच्यावेळी तेथील ग्राहकांना रेंज मिळत नाही. कंपनीचे लोक येण्यापूर्वी युनिट आहे तसे केले जाते. यामुळे ग्राहकांची सेवेबाबत ओरड सुरू होते आणि ग्राहक अन्य खासगी कंपनीकडे वळतात. हा प्रकार शिवसेनेने उघड केला आहे. पुरावा म्हणून त्याचे फोटोदेखील त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे आता बीएसएनएल कंपनी अधिक सतर्क झाली आहे.
कोट
आम्हाला कौतुक आहे की, बीएसएनएल कंपनीची ग्राहकांना एवढी काळजी आहे. त्यांनी जागरूकता दाखवून हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता आम्ही घेऊ.
- अमृता लेले, बीएसएनएलच्या मुख्य प्रबंधक, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.