देवगड नगरपंचायतीची
गुरूवारी सभा
देवगडः येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा गुरूवारी (ता.29) सकाळी 11 वाजता नगरपंचायत कार्यालय सभागृहात होणार आहे. सभेला सर्व संबधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी केले आहे.
.......................................
सावंतवाडी तालुका
अडीच तास अंधारात
सावंतवाडीः सावंतवाडी शहर आणि लगतच्या ग्रामीण परिसराला काल (ता.२५) अडीच तासांहून अधिक काळ अंधारात राहवे लागले. ३३ केव्ही लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा वीजपुरवठा खंडित झाला होता, ज्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडीला वीजपुरवठा करणार्या इन्सुली येथील मुख्य ३३ केव्ही लाईनमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. हा बिघाड शोधून काढण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या कर्मचार्यांनी तातडीने काम सुरू केले होते. दरम्यान, सावंतवाडीचा वीजपुरवठा तात्पुरता कुडाळ येथून जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी ३३ केव्ही लाईनवर अचानक आग पेटल्याने हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे कुडाळमधूनही वीजपुरवठा करणे शक्य झाले नाही.
....................
कणकवलीतून
मोबाईल चोरीस
कणकवलीः शहरातील चिकन, मटण सेंटरवर खरेदीला आलेल्या एका ग्राहकाने मटण विक्रेत्याचा मोबाईलच चोरून नेला. ही घटना काल (ता.२५) दुपारी २.३० च्या सुमारास घडली. काहीवेळाने मटण विक्रेत्याने आपला मोबाईल शोधला असता त्याला तो सापडून आला नाही. त्यामुळे त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ग्राहक म्हणून आलेल्या व्यक्तीनेच मोबाईल चोरी केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्या मटण विक्रेत्याने कणकवली पोलीस ठाणे गाठत तक्रार अर्ज दिला.
.....................
अवधूत मराठेंकडून
पदांचा राजीनामा
वेंगुर्लेः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष अवधूत मराठे यांनी पक्ष सदस्य पदाचा आणि पंचायत समिती विभागीय अध्यक्ष पदाचा राजीनामा तालुकाध्यक्ष यांच्याकडे सादर केला आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्षांकडे दिलेल्या राजीनामा पत्रात मराठे यांनी म्हटले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात काम करण्याची संधी आपल्याला मिळाली होती, लोकांची विकासकामे होत नसल्यामुळे आमची पक्षात परंतु ओढाताण होत आहे. म्हणून मी राजीनामा देत आहे. अवधूत मराठे यांच्या सोबत तुळस बूथचे सर्व अध्यक्ष, महिला अध्यक्षही आपल्या पदाचे राजीनामे देणार आहेत. अवधूत मराठे यांचे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तुळस पंचक्रोशीतील धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. सामाजिक कार्यात ते नेहमी सहभागी होतात.
..........................
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयाचे
भारतीय किसान संघातर्फे स्वागत
सावंतवाडी, ता. २६ ः फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत शेतकर्यांकडे ’सिबिल’ स्कोअर मागणार्या बँकांवर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बँकांना राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिले. ’सिबिल’मुळे शेतकर्याचे नुकसान होत असून चांगले पीक घेण्यासाठी त्याला आर्थिक सहाय्याची गरज असताना बँकेने ते दिले पाहिजे. मात्र, बँका ’सिबिल’ची अट घालून शेतकर्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शेतकर्यांच्या या समस्येबाबत भारतीय किसान संघाने भारतीय ग्रो इकॉनॉमिक रिसर्च सेंटरमाफत केंद्र आणि राज्य शासनासह भारतीय रिझर्व्ह बँकेचे लक्ष वेधले होते. याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत शेतकर्यांना ’सिबिल’ ची अट न घालता, कर्ज देण्याच्या सूचना राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत सर्व बँकांना केल्या, याबद्दल भारतीय किसान संघाने महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.
.......................
ठेकेदाराच्या वेळकाढू धोरणाचा
ओवळीयेवासियांना फटका
सावंतवाडी, ता. २६ ः ओवळीये पुलासह कलंबिस्त रस्त्याबाबत ठेकेदाराचा वेळकाढूपणा व याकडे अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल्यामुळे तो प्रलंबित आहे. याचा फटका पावसाळ्याच्या तोंडावरच ग्रामस्थांना बसत आहे. या बाबत पालकमंत्री नीतेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी सभापती रवींद्र मडगावकर यांनी सांगितले. ओवळीये, कलंबिस्त ही दोन गावे जोडणार्या रस्त्याचा वर्षाभरापूर्वी शुभारंभ झाला. ओवळीये पुलाचे काम चार महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले, ही दोन्ही कामे संथ गतीने कशल्यामुळे वेळेत पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे ओवळीयेवासियांना याचा फटका बसला. पर्यायी व्यवस्थाही न केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. याला ठेकेदारासह अधिकार्यांचा नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.