कोकण

हर्णै ः पर्यटनासह मच्छीमारांचे ५० कोटीचे नुकसान

CD

rat28p15.jpg
66745
हर्णैः येथील बंदरात उभ्या असलेल्या नौका.
rat28p19.jpg
66759
हर्णैः हर्णै बंदराजवळील फत्तेगडावर आदळणाऱ्या लाटा.
rat28p२०.jpg
66760
पावसामुळे मच्छीमारी हंगाम संपल्याने हर्णै बंदरात शुकशुकाट दिसत आहे. (राधेश लिंगायतः सकाळ छायाचित्रसेवा)
-------------
पर्यटनासह मच्छीमारांचे
५० कोटीचे नुकसान
दापोली तालुका ; मे महिन्यातील पावसाने गणित कोलमडले
राधेश लिंगायतः सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २८ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश परिस्थितीमुळे यंदा मे महिन्यातच मुसळधार पाऊस पडला. त्याचा फटका मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध दापोली तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. ऐन सुट्टीच्या हंगामात पंधरा दिवस अगोदरच मासेमारी आणि पर्यटन हे दोन्ही व्यवसाय बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. त्यामुळे सुमारे ५० कोटीचे नुकसान सहन करावे लागणार आहे.
जिल्ह्यात २० मे पासून आजपर्यंत वादळीवाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. या कालावधीत होणारी कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली. साधारण एप्रिलमध्ये मुलांच्या परीक्षा आटोपल्या की, मे महिन्यात दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची चांगलीच गर्दी होते. ७ मे पासून युद्धजन्य परिस्थितीचा पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला. त्या वेळी काही हॉटेलमधील बुकिंग पर्यटकांनी रद्द केली; परंतु युद्ध थांबल्यावर पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाली. किनारे पर्यटकांनी फुलून गेले. परिस्थिती निवळत असतानाच मान्सुनपूर्व पावसाने तोंड वर काढले.
शासनाच्या नियमानुसार, १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी असते तर सागरी जलपर्यटन २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीसाठी बंद केले जाते. त्यामुळे मे महिना दोन्ही व्यावसायिकांसाठी अतिशय महत्वाचा असतो; परंतु यंदा हंगाम संपण्यापूर्वीच पावसाने सर्वांचीच मोठी निराशा केली. पावसामुळे हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला. पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाल्याने साठवण करून ठेवलेले मासळी, मटण, चिकन, आईस्क्रीम व अन्य दुग्धजन्य पदार्थांचेही नुकसान झाले. त्यामुळे यंदा पर्यटन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
हंगामाच्या अखेरीस मच्छीमार पावसाळ्याची बेगमी करून ठेवण्यासाठी अखेरच्या टप्प्यात मासेमारीला जात असतात. मे महिन्यात पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत असल्यामुळे मासळीची मागणी वाढते आणि दरही चांगला मिळतो. हर्णै बंदरात ताजी मासळी खरेदीसाठी झुंबड उडते तसेच सुकी मासळीलाही प्रचंड मागणी होती; मात्र यावर्षी पावसामुळे अंतिम टप्प्यातील उत्पन्नाला मच्छीमारांना मुकावे लागले. शेवटच्या टप्प्यात कोळंबी, पापलेट, म्हाकुळ, बिलजा यासारखी मासळी मच्छीमारांच्या जाळ्यात मिळत होती; मात्र त्यावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे सर्वच खर्च अंगावर पडणार असल्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे. खलाशांचा पगार देणे अशक्य झाले आहे. बर्फ, डिझेल यांसह अन्य खर्च मच्छीमारांच्या पदरात पडेल, अशी स्थिती आहे. हा खर्च कसा भरून काढायचा? असा प्रश्न मच्छीमारांपुढे आहे.

चौकट
मासेमारीवर अवलंबून अन्य उद्योगही संकटात
मासेमारीवर अवलंबून असलेल्या हर्णै बंदरातील बर्फ कंपन्या, फेरीवाले, हार्डवेअर, किराणा अशा अनेक छोट्या उद्योगांवरही होणार आहे. मासेमारी बंदीसाठी अजून काही दिवस शिल्लक असले तरीही मान्सून आणि खवळलेला समुद्र पाहता नौका समुद्रात नेणे अशक्य आहे. बहुसंख्य मच्छीमारांनी आंजर्ले खाडीत नौका शाकारण्याची तयारीही केली आहे. त्यामुळे बाजारात माशांचे प्रमाण घटले आहे.

चौकट
वॉटर स्पोटर्सलाही फटका
जलक्रीडा उद्योगातून अनेक कुटुंबे सावरली आहेत. यंदा पावसामुळे १० दिवस अगोदर वॉटरस्पोर्ट्स बंद करावे लागले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसानही झाले आहे. पुढील चार महिने व्यवसाय बंद राहिल्यामुळे या कालावधीत आम्ही करायचं काय, असा प्रश्न व्यावसायिकांना पडल्याचे दापोलीतील मुरूड वॉटरस्पोर्ट्सच्या सदस्यांनी सांगितले.

चौकट
मच्छीमारांचे २० कोटींचे नुकसान
मासेमारी व पर्यटन या दोन्ही व्यवसायांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनाही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. हर्णै बंदरात दररोज १ कोटींची उलाढाल होते; परंतु २० ते ३१ मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसामुळे ११ कोटींची उलाढाल झालेली नाही. या १० दिवसांमध्ये एका नौकेला सुमारे २ लाखाचे उत्पन्न मिळाले असते, त्यावर पाणी फेरावे लागणार आहे. दाभोळपासून ते केळशीपर्यंत सुमारे १००० नौका असून त्यांचे सुमारे २० कोटींचे नुकसान या पावसाने केले आहे.

कोट १
अद्याप कधी असा हा ऐन हंगामात पाऊस आला नव्हता, यामुळे आम्हा मच्छीमारांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व खर्च अंगावर पडला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये किमान एका नौकेला अंदाजे २ ते २.५० लाखाचा तरी फायदा झाला असता. त्यामुळे नोकरपगार तरी भागवता आला असता. आधीचा हंगाम तोट्यातच गेला होता. त्यात शेवटच्या हंगामात काहीतरी निभाव लागेल, अशी अपेक्षा होती; पण बिघडलेल्या वातावरणामुळे मच्छीमारांना मोठी चिंता लागून राहिली आहे की, आताचा खर्च तसेच दोन महिन्यांनी येणारा नवीन हंगामाचा खर्च कसा उभा करायचा?
- अनंत चोगले, मच्छीमार

कोट २
बिघडलेल्या वातावरणामुळे येथील मच्छीमारांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या शेवटच्या दिवसांमध्ये मच्छीमार जे काही कमावतो त्याच कमाईच्या आधारावर पुढील बंदीच्या कालावधीत आपले कुटुंब चालवत असतो; परंतु किमान ११ दिवस अगोदरच आलेल्या पावसाळी तसेच वादळसदृश परिस्थितीमुळे मच्छीमारांचे कंबरडेच मोडले आहे. शासनाकडे एक विनंती आहे की, ज्या वेळी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर नुकसान भरपाई दिली जाते त्याप्रमाणे जे आपल्या निकषांमध्ये बसेल या तत्त्वावर मच्छीमारांनासुद्धा या झालेल्या नुकसानीबाबत विचार करून पॅकेज मंजूर करावे.
- डी. एम. वाघे, चेअरमन, सागरपुत्र मच्छीमार सहकारी संस्था, पाजपंढरी

कोट ३
यंदा बदलत्या वातावरणामुळे पर्यटन हंगाम संपवावा लागला. यामध्ये आम्हा पर्यटन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ते कसे भरून काढायचे? कारण, या महिन्यात होणाऱ्या मिळकतीवर पुढचा पर्यटन हंगाम चालू होईपर्यंत आम्ही अवलंबून असतो.
- सचिन तोडणकर, सरपंच, कर्दे

कोट ४
मे महिन्यातच झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने पर्यटन व्यवसायाची दुर्दशा झाली. मे महिन्यातच आमचे कमवायचे दिवस असतात. अगदी १० जूनपर्यंत हा व्यवसाय सुरू असतो. मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि २० मे रोजी दुपारी साडेतीन वाजता गेलेली वीज सुमारे २४ तासांनी म्हणजे २१ मे रोजी दुपारी ३ वाजता आली. त्यामुळे आलेले पर्यटक कंटाळून निघून गेले. हा मोठा फटका येथील पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. यापूर्वी पर्यटन व्यवसायाला कधीही असा फटका बसला नव्हता. संपूर्ण किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकांचे मिळून सुमारे २० ते २५ कोटींचे नुकसान झाले आहे.
- अद्वैत जोशी, पर्यटन व्यावसायिक, मुरूड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला मायदेशी परतले; दिल्ली विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत, पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Sunday Special Healthy Breakfast: रविवारी बनवा स्पेशल गुजराती नाश्ता; लिहून घ्या चवील मस्त अशा पालक पुडलाची रेसिपी

आजचे राशिभविष्य - 17 ऑगस्ट 2025

लंबी रेस का घोडा!

परभणीचे ‘बारव’ वैभव

SCROLL FOR NEXT