कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा
चिपळूण पालिकेचा उपक्रम; दुकाने, आऊटलेटमधील खरेदीवर सवलत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण पालिकेने एक पाऊल पुढे टाकत दररोज कचरा द्या आणि बक्षीस गुण (रिवॉर्ड पॉईंट) मिळवा. तसेच त्या पॉईंटच्या आधारे स्थानिक दुकाने, आऊटलेट आणि मॉल्समधून खरेदीवर भरघोस सवलत मिळवा, असा एक अभिनव व आधुनिक उपक्रम राबवला आहे. त्यासाठी एक अॅप विकसित केले. या उपक्रमाचा फायदा सर्वसामान्य नागरिक आणि शहरातील व्यापाऱ्यांना होणार आहे. घनकचरा संकलनात अशाप्रकारे आधुनिक उपक्रम राबवणारी संपूर्ण कोकणात चिपळूण पहिली पालिका ठरली आहे.
चिपळूण पालिकेने यापूर्वी स्वच्छ भारत अभियानात भाग घेऊन अनेक नवनवीन उपाययोजना व उपक्रम राबवून कोकणात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने स्वच्छ, सुंदर व रोगराईमुक्त शहरासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अत्याधुनिक प्रणालीचा उपयोग करून घनकचरा संकलनातून थेट शहरातील नागरिकांना सवलत आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे सशक्तीकरण करतानाच ऑनलाईन खरेदीला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.
शहरात दररोज ओला आणि सुका असा १५ टन कचरा संकलित केला जातो. नागरिकांनी दररोज ओला आणि सुका कचरा पालिकेच्या घंटागाडीत दिल्यानंतर व सफाई कर्मचाऱ्यांनी तो कचरा संकलित केल्यानंतर नागरिकांना दिलेले क्यूआर कोड कर्मचारी स्कॅन करतील. हे स्कॅनिंग होताच त्या नागरिकांच्या अॅपमध्ये रिवॉर्ड पॉईंट जमा होतील. त्याची तत्काळ माहिती नागरिकांना मोबाईलवर मिळेल. त्यासाठी निर्माण केलेले अॅप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. चिपळूण पालिकेने या उपक्रमासाठी आधुनिक प्रणालीचे आयटीआय लिमिटेडद्वारे आयसीटी बेस टेक्नॉलॉजी आधारित अॅप तयार केले आहे. त्यासाठी क्यूआर कोड देण्यात आला आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर अॅप डाऊनलोड करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर आपल्या मोबाईलवर ही योजना सुरू होणार आहे. अत्यंत सोप्या व सरळ पद्धतीने या आधुनिक अॅपचा वापर करता येणार आहे. जसे रिवॉर्ड पॉईंट जमा होतील त्याची माहिती नागरिकांना सवलत मिळत राहणार आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश पेढांबकर, सुजित जाधव, वैभव निवाते व आर. के. सिन्हा आणि कर्मचारी मेहनत घेत आहेत.
चौकट
नागरिकांना थेट सवलत
पॉईंट जमा झाल्यानंतर नागरिकांनी स्थानिक दुकाने, आऊटलेट व मॉल्समध्ये जाऊन संकलित रिवॉर्ड पॉईंट दाखवल्यानंतर त्या ठिकाणी खरेदीवर सवलत मिळणार आहे. संकलित पॉईंटवर ठराविक टक्केवारीनुसार ही सवलत दिली जाणार आहे. त्यामुळेच दररोज ओला, सुका कचरा द्या आणि खरेदीवर सवलत मिळवा, अशी एक आगळीवेगळी संकल्पना ठरणार आहे.
चौकट
व्यापाऱ्यांचाही मोठा फायदा
चिपळूण शहरातील नागरिकांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळतानाच स्थानिक व्यापाऱ्यांनादेखील या उपक्रमाचा फायदा होणार आहे. संबंधित व्यापाऱ्यांकडे कोणत्याही जाहिरातीशिवाय ग्राहक जोडले जाणार आहेत. त्यामुळे साहजिकच विक्रीमध्ये वृद्धी होणार आहे तसेच संबंधित व्यापाऱ्यांची विनामोबदला जाहिरातदेखील होणार आहे.
चौकट
ऑनलाईन खरेदीला पर्याय
सध्या ऑनलाईन खरेदीकडे मोठा कल आहे. तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकदेखील ऑनलाईन खरेदीमध्ये गुंतलेले दिसून येतात. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत त्याचा परिणाम जाणवतो तसेच ऑनलाईन खरेदीमध्ये अनेकदा फसवणूक होण्याचा धोका असतो; मात्र पालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिक स्थानिक आस्थापनेकडे वळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.