-rat७p१६.jpg-
२५N६८८५७
मुंबई ः २६ वर्षे झाल्याबद्दल कोकणवासीयांच्या लाडक्या मांडवी एक्सप्रेसला मुंबईमध्ये सजवण्यात आले होते.
---
कोकण रेल्वेमार्गावरील ‘खाद्यराणी’ला २६ वर्षे पूर्ण
मांडवी एक्स्प्रेस : मुंबईत कोकण रेल्वेप्रेमींनी केला जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः कोकणवासीयांची लाडकी तसेच रेल्वेप्रेमी व नियमित प्रवाशांमध्ये खाद्यराणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेसच्या २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज रेल्वेप्रेमींनी उत्साहात साजरा केला.
तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांनी रेल्वे अर्थसंकल्पात सांगितल्यानुसार, १ जुलै, १९९९ पासून मुंबई आणि मडगावदरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू झाली. मुंबई-गोवा मार्गावर दिवसाची सेवा देणारी ही पहिलीच एक्स्प्रेस होती. तत्पूर्वी सुरू असणारी कोकणकन्या एक्स्प्रेस रात्रीची सेवा देत होती तर दिवा-सावंतवाडी पॅसेंजर संथगतीने जात असल्यामुळे लांबच्या प्रवाशांना अडचणी येत होत्या. कोकणवासीयांना दिवसाच्या जलद प्रवासाची सवय याच इंटरसिटी एक्स्प्रेसने लावली.
गेज बदलण्यापूर्वी मिरज वास्कोदरम्यान मांडवी एक्स्प्रेस धावत असे; परंतु ब्रॉडगेज मार्ग झाल्यावर ती बंद करण्यात आली व मुंबई-मडगाव दरम्यानच्या इंटरसिटी एक्स्प्रेसचे नामकरण मांडवी एक्स्प्रेस म्हणून करण्यात आले. तसेच पूर्वी केवळ आसनी डबे असणाऱ्या गाडीचे रेकनंतर कोकणकन्या एक्स्प्रेससोबत एकत्रित करण्यात आल्यामुळे मांडवी एक्सप्रेसला स्लीपर डबे मिळाले. पुढे १० जून २०१९ पासून या दोन्ही गाड्यांना आधुनिक एलएचबी डबे देण्यात आले. १ फेब्रुवारी २०२४ पासून मांडवी एक्सप्रेसला दोन अद्ययावत एसी थ्रीटायर इकॉनॉमी डबे जोडण्यात आले. वेगवेगळी स्थित्यंतरं पाहत मांडवी एक्स्प्रेस गेली २६ वर्षे कोकणवासीयांची अविरत सेवा करत आहे.
रेल्वेप्रेमींनी रात्रभर जागून गाडीचे इंजिन सजवले. त्यानंतर पहाटे ५.४५ ला मडगावहून कोकणकन्या एक्स्प्रेस मुंबईत दाखल झाल्यानंतर गाडीचे डबेही सजवण्यात आले. चिन्मय कोले यांनी नारळ वाढवून पुढील कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने ढोलताशा व तुतारीच्या गजरात गाडीचे इंजिन जोडण्यात आले.
-----
चालक, तिकीट तपासनिसांचा सत्कार
गाडीचे चालक (लोको पायलट व साहाय्यक लोको पायलट), तिकीट तपासनीस, पॅन्ट्री कार कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यासाठी चिन्मय कोले, साहिल कोसिरेड्डी, अमित फाटक, राहुल नायर, शुभम नागपुरे, अभय आभाळे, अनुष जाधव, यश राणे, ओमकार फाटक, आदित्य कांबळी आणि अक्षय महापदी यांनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.