-rat९p४.jpg-
२५N६९२८४
चिपळूण ः सीआरए तंत्राची माहिती देताना कृषी विभागाचे अधिकारी.
----
चिपळुणात १२.५० हेक्टरवर आंबा, काजू लागवड
शेतकऱ्यांनी साधला मृग नक्षत्राचा मुहूर्त; १८ गावांमध्ये विशेष प्रात्यक्षिके
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः कोकणातील शेतकऱ्यांसाठी मृग नक्षत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात पडणारा पाऊस फळझाडांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी अनुकूल असतो. या मुहूर्ताचे औचित्य साधून चिपळूण तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी चिपळूण उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच २३ शेतकऱ्यांनी १२.५० हेक्टर क्षेत्रावर आंबा आणि काजू फळांची यशस्वी लागवड केली आहे.
कृषी विभागाच्या या मोहिमेदरम्यान सीआरए (हवामान अनुकूल शेती पद्धती) या आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. बदलत्या हवामानाचा विचार करून हे तंत्र विकसित करण्यात आले आहे. त्यासाठी साहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांनी चिपळूण तालुक्यातील १८ गावांमध्ये विशेष प्रात्यक्षिकं आयोजित केली होती. शेतकऱ्यांना सीआए तंत्राचे महत्त्व समजावून सांगितले. या पद्धतीमुळे पाण्याची बचत होते, जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि फळझाडांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होते, जे शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभ घेऊन आली आहे. या योजनेमुळे केवळ ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळत नाही तर शेतकऱ्यांना आपल्या शेतात दीर्घकालीन उत्पन्न देणाऱ्या फळबागांची लागवड करण्याची संधीही मिळते. सीआरए तंत्राचा वापर करून केलेली ही लागवड केवळ तात्पुरती नाही तर ती दीर्घकालीन कृषी विकास आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
------
कोट
मृग नक्षत्रातील मुहूर्ताचा फायदा घेऊन मनरेगांतर्गत फळबाग लागवड योजनेत सहभागी व्हा. याची अधिक माहिती गावातील साहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधा. ही योजना शेतीत समृद्धी आणण्याची आणि जीवनात स्थैर्य निर्माण करण्यासाठीची उत्तम संधी आहे.
- शिवाजी शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी, चिपळूण
--
काय आहे सीआरए तंत्र
सीआरए म्हणजे हवामानातील प्रतिरोधक कृषी तंत्रज्ञान होय. आंबा, काजूसाठी जो खड्डा खोदला जातो त्याच्या चारही बाजूला दीड ते दोन इंची पाईप ठेवायचे. त्या पाईपमध्ये शेणखत, गांडूळखत, वाळू, माती टाकून भरायचे. त्यानंतर खड्डा रोप लावून बुजवायचा तसेच पाईपही काढून घ्यायचे. या पद्धतीमधून रोपाच्या मुळांना अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित होतो आणि रोपांची वाढ चांगली होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.