-rat९p१९.jpg-
P२५N६९३३५
खेड ः चौपदरीकरणानंतरही दरडीचा धोका कायम आहे.
-rat९p१८.jpg-
२५N६९३३४
भोस्ते घाटातील अवघड वळण.
------
भोस्ते, परशुराम घाटात धोकादायक वळणे
वाहनचालकांची कसरत; पावसाळ्यात अधिक धोका, दरडी कोसळण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ : मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड वळणे जीवघेणी ठरत आहेत. महामार्गाचे अर्धवट स्थितीत काम आणि ठिकठिकाणी असलेले पर्यायी रस्तेदेखील अधिक धोकादायक ठरत आहेत. भोस्ते घाटातील अवघड वळण हे वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. या घाटातून वाहने हाकताना वाहनचालकांना जपून वाहने हाकावी लागत आहेत.
सद्यःस्थितीत भोस्ते घाटातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. परशुराम घाटातील काम अर्धवट स्थितीत आहे. कशेडी घाटाला पर्यायी बोगदा काढण्यात आला आहे. हे सारेच सगळे सुरळीत दिसत असले तरी देखील या घाटातील अवघड वळणे जीवघेणी असून, पावसाळ्यात या वळणाचा अधिक धोका संभवतो. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचादेखील धोका आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात घाटातून प्रवास बिकटच म्हणावा लागेल. गतवर्षीच्या पावसाळ्यात भोस्ते घाटात अनेकदा दरड कोसळण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे घाटातून एकेरी वाहतूक सुरू होती. परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होती. कशेडी घाटात पोलादपूर हद्दीत भोगावनजीक थोड्याफार प्रमाणात रस्ता दरवर्षीच खचतो आहे. यावर्षीही परिस्थिती वेगळी नाही; परंतु कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या बोगद्याचे काम पूर्णत्वास गेल्यामुळे तितकासा गंभीर प्रश्न उद्भवणार नाही; मात्र यावर्षीही महामार्गावरील भोस्ते, परशुराम घाटात वारंवार दरड कोसळून घाट वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी काढण्यात आलेल्या गटारांमधून साचलेला कचरा काढण्यासाठी राष्ट्रीय बांधकाम विभागाने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
या मार्गावरील भोस्ते, परशुराम हे घाट नागमोडी वळणांमुळे धोकादायक मानले जातात. या घाटात पावसाळ्यात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत तसेच गेल्या तीन-चार वर्षांत या (भोस्ते-परशुराम ) या दोन्ही घाटातून रूंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे झालेल्या डोंगरकटाईमुळे दरडीचा धोका अधिक आहे. चौपदरीकरणानंतर भोस्ते घाटातील धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे. या घाटातील एक अवघड वळण काढण्यात आले असले तर दुसरे अवघड वळण ठेकेदाराने आणखीनच अवघड करून ठेवल्याने या वळणावर दर दोन दिवसांआड अपघात होत आहेत. गेल्या वर्षभरात या वळणावर अंदाजे ५० ते ६० अपघात झाले आहेत.
चौकट
४४ किमी रस्त्यावर चालकांची कसरत
कशेडी घाटाचा पायथा ते परशुराम घाटादरम्यानच्या ४४ किलोमीटर रस्त्याचे काम कल्याण टोलवेज इन्फास्ट्रक्चर या कंपनीकडे आहे. अन्य तालुक्यांमध्ये काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीने महामार्ग चौपदरीकरणाचे काम जलदगतीने केले असले तरी संपूर्ण ४४ किलोमीटरच्या रस्त्यात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. कशेडी घाटाच्या पायथा ते भरणेनाकादरम्यानच्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात रस्ता समपातळीत ठेवण्यात ठेकेदार कंपनीला अपयश आले आहे. परिणामी, या दरम्यान होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्यावरून धावणारी वाहने आदळत आपटत धावत असल्याने चौपदरीकरणापेक्षा आधीचा रस्ता चांगला होता, असे म्हणायची वेळ वाहनचालकांवर आली आहे.
कोट
या अवघड वळणावर आम्ही गतिरोधक बसवले आहेत तसेच तीव्र उतार वाहने सावकाश हाका, अशा आशयाच्या सूचनाफलक देखील लावले आहेत. हे वळण पूर्वी छोटे होते. त्या ठिकाणी अपघात होत असत म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाने तेथील रस्ता रुंद केला आहे. हे वळण काढण्यासाठी शासकीय स्तरावर ४० कोटींचा निधी मंजूर झाला असून, पावसाळ्यानंतर अवघड वळण काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
--पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.