‘ओटीपी’ समस्येमुळे
शिक्षकांची तारांबळ
कणकवली ः जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत ऑनलाईन बदल्यांसाठीचा पोर्टल सुरू केला आहे. यात संवर्ग १ व २ साठी बदलीबाबत माहिती भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती; मात्र पहिल्या दिवशी शनिवारी (ता. ७) लॉगिन होत नव्हते, तर रविवारी (ता. ८) अनेकांना लॉगिनसाठी ओटीपी येत नसल्याने शिक्षक अडचणीत आले आहेत. यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे. यावर्षी शिक्षक बदलीसाठीची प्रक्रिया मेऐवजी जूनमध्ये सुरू केली. त्यानुसार ७ व ८ जूनला संवर्ग १ व २ ला बदली हवी की नको, याची माहिती भरण्यासाठी मुदत देण्यात आली. यासाठीचे पोर्टल ७ ला ओपन झाले. मात्र, यात आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत बदली झाल्याने तुम्ही बदलीपात्र नसल्याचा मेसेज येत असल्याने पुढील प्रक्रियाच होत नव्हती. त्यामुळे ७ ला अर्ज भरता आले नाहीत, तर ८ ला सुरुवातीपासूनच ओटीपीची समस्या उद्भवू लागली. त्यात रविवारीच ही प्रक्रिया करायची असल्याने कार्यालयेही बंद होती. कुणाशी संपर्क साधूनही उपयोग होत नव्हता. अनेक शिक्षक दिवसभर ओटीपीची वाट पाहत होते; मात्र ओटीपी न आल्याने अनेकांना अर्जच भरता आलेले नाहीत.
....................
शिवराज्याभिषेक दिन
दोडामार्गात उत्साहात
दोडामार्ग ः छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार आपण अंगीकृत केले पाहिजे, असे प्रतिपादन अॅड. सोनू गवस यांनी केले. फक्रोजीराव देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग येथे शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम झाला, यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन केले. श्री. गवस यांनी ‘नागरिकांचे कर्तव्य आणि शिष्टाचार’ यावर मार्गदर्शन केले. ‘शिवाजी महाराज व सामाजिक समरसता’ या विषयावर प्रा. डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे यांनी मार्गदर्शन केले. संस्था व्यवस्थापन समिती सदस्य अंकुश जाधव, सतीश घोटगे यांनीही मार्गदर्शन केले. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकतामंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम झाला. या दिनाचे औचित्य साधत तालुक्यात दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले.
-------
हिराबाई जाधवांना
‘गुणवंत कर्मचारी’
मसुरे ः आरोग्य केंद्र कसाल, उपकेंद्र कुसबे येथील आरोग्य सेविका हिराबाई जाधव-चव्हाण यांना यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५ अंतर्गत राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थितीत होते. या पुरस्कारामुळे हिराबाई जाधव-चव्हाण यांचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मुख्य संघटक व माजी उपाध्यक्ष विजय चव्हाण यांनी अभिनंदन केले.
------
घोटगेत शेतकऱ्यांना
भात बियाणे वाटप
कणकवली ः घोटगे ग्रामपंचायतीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गावातील २५० शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सरपंच चैताली ढवळ व उपसरपंच विजय नाईक यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्या अनुसया ढवळ, रमाकांत कोरगावकर, पंढरीनाथ गुरव, जयश्री मडवळ, लतिका गुरव, ग्रामसेवक गणेश भोगले, कृषी सहायक रोशन मर्गज व शेतकरी उपस्थित होते.
.....................
वृक्षांच्या बियांची
कारिवडेत पेरणी
सावंतवाडी ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आप्पासाहेब पटवर्धन विद्यालय, कारिवडेच्या विद्यार्थ्यांनी गावातील जंगल परिसर व पडीक जमिनीवर विविध वृक्षांच्या बियाण्यांची पेरणी केली. मुख्याध्यापक डी. बी. साईल यांच्या पुढाकाराने हा पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.