-rat९p२०.jpg-
P२५N६९३३६
दक्षिण आफ्रिका : जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर भारतीय ध्वज दाखवताना डावीकडून प्रसाद देवस्थळी व डॉ. तेजानंद गणपत्ये.
कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरी, चिपळूणचा झेंडा
कोकणातच सराव; डॉ. तेजानंद गणपत्ये, प्रसाद देवस्थळी यांची कामगिरी
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : दक्षिण आफ्रिकेमधील जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रविवारी रत्नागिरीच्या प्रसाद देवस्थळी (११ तास ३८ मिनिटे, ४९ सेकंद) आणि चिपळूणमधील डॉ. तेजानंद गणपत्ये (११ तास २४ मिनिटे, ४१ सेकंद) यांनी झेंडा रोवला. कोकणातच सराव करून त्यांनी या यशाला गवसणी घातली तसेच मुळचे खेड येथील व सध्या ठाणे स्थित सुरेश वेलणकर यांनी दिव्यांगत्वावर मात करत ही स्पर्धा पूर्ण करून पदक मिळवले. या मॅरेथॉनमध्ये कस लावणारी थंडी आणि विषम वातावरणाचा सामना करावा लागला.
जगातील सर्वांत जुनी, प्रसिद्ध अल्ट्रामॅरेथॉन असलेल्या या मॅरेथॉनमध्ये जगभरातील २३ हजार धावपटू या सहभागी झाले. पिटर्समारीजबर्ग ते डरबन हे ९० किमी अंतर १२ तासात पार करायचे होते. अनेक चढ-उतार, डोंगर, अडथळे पार करत देवस्थळी व डॉ. गणपत्ये यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. चिपळूण सायकलिंग क्लबचे डॉ. गणपत्ये यांनी २ वेळा लोहपुरुष, सायकलिंगमध्ये एसआर, हाफ आर्यनमॅन, ट्रायथलॉन पूर्ण केल्या आहेत.
धावनगरी रत्नागिरी अशी ओळख करून देणारे प्रसाद देवस्थळी हे मॅरेथॉन आयोजित करतात. या वेळी देवस्थळी यांनी कुटुंबीय, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन टीमचे आणि कोच दादासो सत्रे यांचे विशेष आभार मानले. बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये असलेल्या आपल्या सुविद्य पत्नीच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.
कोट १
कॉम्रेड मॅरेथॉनविषयी खूप ऐकले होते; परंतु प्रत्यक्ष तिथली भव्यता बघून मन भरून आलं. विविध देशांचे, वंशाचे हजारो अॅथलिट्स आमच्याबरोबर धावत होते. संपूर्ण मार्गावर छोट्या छोट्या गावातूनही दक्षिण आफ्रिकेचे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आम्हाला चिअरअप् करत होते. विशेषतः आम्हाला बघून इंडिया इंडिया, नमस्ते, जय हिंद असे बोलून प्रोत्साहन देत होते. शेवटच्या ३० किलोमीटरमध्ये टाकलेले प्रत्येक पाऊल हे सहनशक्तीची परीक्षा घेणारे होते. प्रसाद आणि मी ही स्पर्धा पूर्ण करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले धावपटू ठरलो, याबद्दल आनंद आहे.
- डॉ. तेजानंद गणपत्ये, चिपळूण
----------
कोट २
सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून स्पोर्ट्स टुरिझम हा विषय हाती घेण्यात आला आहे. फाउंडेशनतर्फे नुसत्या स्पर्धा आयोजित न करता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आयोजन कसे असावे, हे कळण्यासाठीच मी स्पर्धेत सहभागी झालो. वैयक्तीक कामगिरी हा विषय नव्हता; पण अर्थातच मोठी मॅरेथॉन पूर्ण केल्याचे समाधान आहे. एवढ्या स्वरूपातली अल्ट्रा मॅरेथॉन कोकणात लवकरात लवकर व्हावी याकरिता धावताना काही किलोमीटरनंतर कशा पद्धतीने नियोजन असतं याचे व्हिडिओसुद्धा केले. वैयक्तीक कामगिरीपेक्षा कोकणवासियांना ही मोठी स्पर्धा कशी असते, हे समजावे यासाठी प्रयत्न केला.
- प्रसाद देवस्थळी, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.