वेगमर्यादेचा वाहनचालकांकडून भंग
अंकूश आवश्यक : घाट भागात ४० किमी वेग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : राज्यातील रस्त्यावर वाहनांसाठी ताशी वेगमर्यादा निश्चित केली आहे; मात्र वेगमर्यादेचा नियम धाब्यावर बसवून वाहनधारक वाहने चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवळी येथील गॅसवाहू टॅंकर हे त्याचे उदाहरण आहे. अवजड, मालवाहू वाहनांना समतल रस्त्यावर ताशी ८० तर घाटभागात ताशी ४० किमीप्रमाणे वेगमर्यादा आहे. परंतु निवळीतील अपघातग्रस्त टॅंकरचा वेग ताशी ६० ते ७०किमी असल्याने हा अपघात झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. महामार्गावरील वाहनांच्या वेगमर्यादेवर कोणताही अंकूश नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियमावर बोट ठेवून अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवल्यास अनेक अपघात टळतील, असे अभ्यासकांचे मत आहे.
राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी मोटारवाहन अधिनियम १९८८चे कलम ११२ मधील तरतुदीनुसार राज्यातील रस्त्यावर वाहनांसाठी ताशी वेगमर्यादा निश्चित केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने रस्तेसुरक्षा यांनी रस्ते अपघात आणि यामध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये दरवर्षी १० टक्के घट करण्याच्यादृष्टीने आदेश दिले आहेत. राज्यातील ३० टक्के अपघात हे वाहनचालक यांनी भरधाव वेगाने वाहने चालवल्यामुळे होतात. राज्यातील विविध रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती, भूप्रदेश, घाटरस्ते, वळणरस्ते, समतल रस्ते आणि रस्त्यातील चढ-उतार आदींचा सांगोपांग विचार करण्यात आला आहे.
चौकट
अशी आहे वेगमर्यादा
एम १ श्रेणीतील ८ प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापर होणाऱ्या वाहनांना द्रुतगती मार्गावर समतल भागात ताशी १०० किमी, घाटमाथ्यावर ५० किमी, राष्ट्रीय महामार्गावर समतल भागात ९० तर घाटामध्ये ५० किमी तर शहरी भागात ६० ते ४० वेगमर्यादा आहे. प्रवासी मोटारवाहन ज्यामध्ये ९ किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होते त्या वाहनांना द्रुतगती मार्गावर समतल भागात ८०, घाटात ४०, महामार्गावर समतल भागात ८०, घाटात ४० तर शहरी भागात ५० ते ३० किमी वेगमर्यादा आहे. माल व सामान वाहतुकीच्या वाहनांसाठी द्रुतगती मार्गावर समतल भागात ८० तर घाटात ४०, राष्ट्रीय महामार्गावर समतल भागात ८० तर घाटात ४० पालिका भागात ताशी ४० ते ३० किमी अशी वेगमर्यादा घालून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.