सिंधुदुर्गनगरीत २१ ला
आंतराष्ट्रीय योग दिन
सिंधुदुर्गनगरीः जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून व जिल्हा योग संघटनेच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा संकुल येथे २१ जूनला सकाळी ७.३० वाजता आंतराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली. जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन. सी. सी, मेरा युवा भारत, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा, असे आवाहन केले आहे. शारीरिक व आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्त्व विचारात घेऊन प्रतिवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. योग हा भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे.
..................
बालकामगार विरोधी
दिनानिमित्त जागृती
सिंधुदुर्गनगरीः बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती होण्यासाठी शासनाच्या विविध विभागामार्फत व विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी, कार्यालयामार्फत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी यांनी दिली. सर्व औद्योगिक संघटना, असोशिएशन, व्यापारी असोशिएशन, क्रीडाई-बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी असोसिएशन, सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, नागरिक यांनीही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती करून या मोहिमेत सहभाग नोंदवावा व जिल्हा बालकामगार मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
...................
‘आयुष्मान वय वंदना
योजनेचा लाभ घ्या’
सिंधुदुर्गनगरीः भारत सरकारने १ एप्रिलपासून ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत मोफत आरोग्य सेवा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ७० वर्षे व त्यावरील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत केंद्राच्या निर्णयानुसार वेळोवेळी इतर लाभार्थी कुटुंबांचा समावेश करण्यात येऊन त्यांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत विनामूल्य वैद्यकीय लाभ प्रदान करण्यात येत आहे.
..................
आरटीओची जुलैपासून
तालुकानिहाय शिबिरे
सिंधुदुर्गनगरीः उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे जिल्ह्यात जुलै ते डिसेंबर या कालावधीत तालुकानिहाय शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित केले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिली. तारखांप्रमाणे होणारी शिबिरे अशीः जुलै-देवगड २, कणकवली ३ व २३, मालवण ९, वेंगुर्ले १०, सावंतवाडी १६ व १४, दोडामार्ग १७. ऑगस्ट-देवगड ५, कणकवली ६ व २०, मालवण ७, वेंगुर्ले १२, सावंतवाडी १३ व २१, दोडामार्ग १९. सप्टेंबर-देवगड २, कणकवली ३ व २४, मालवण ९, वेंगुर्ले १०, सावंतवाडी १७ व २५, दोडामार्ग १८. ऑक्टोबर-देवगड ७, कणकवली ८ व २८, मालवण ९, वेंगुर्ले १४, सावंतवाडी १५ व २९, दोडामार्ग १६. नोव्हेंबर-देवगड ४, कणकवली ६ व २६, मालवण १२, वेंगुर्ले १३, सावंतवाडी १९ व २७, दोडामार्ग २०. डिसेंबर-देवगड ३, कणकवली ४ व २४, मालवण १०, वेंगुर्ले ११, सावंतवाडी १७ व २४, दोडामार्ग १८ तारीख.
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.