swt128.jpg
70125
देवगडः तालुक्यातील तळवडे येथील धबधबा सुरू झाला आहे. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
वर्षा पर्यटनाची पहिल्याच टप्प्यात ‘ब्रेक जर्नी’
अकाली सुरवात पर्जन्यधारा मंदावल्याने पर्यटकांचे बेत लांबणीवर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ ः ऐन मे महिन्यात अवेळी बुरसलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे अकाली बहरलेल्या वर्षा पर्यटनाला दडी मारून पावसानेच ब्रेक लावला आहे. त्यामुळे तरुणाईचे वर्षा पर्यटनाचे बेत लांबणीवर पडण्याची शक्यता आहेत. काही भागातील धबधबे प्रवाहित झाले असले तरीही पावसाळी वातावरण नसल्याने मौजमजेला मर्यादा येत आहेत. त्यामुळे तरुणाईला आता पुन्हा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यंदा वेळेआधीच मॉन्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. सलग काही दिवस दमदार बुरसलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे पर्यटकांच्या नकाशावर असलेले नैसर्गिक धबधबे प्रवाहित झाले आणि वर्षा पर्यटनाची चाहूल लागली. वेळेआधीच आलेला मॉन्सूनपूर्व पाऊस आणि त्याला जोडूनच सक्रिय झालेला मॉन्सून यामुळे वर्षा पर्यटनाचे बेत आखले गेले आणि त्याची प्रत्यक्ष सुरुवातही झाली. ऐन मेमध्ये अकाली वर्षा पर्यटन बहरले. यामुळे तरुणाईबरोबर महिलांनीही वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यास सुरुवात केली. दरवेळी जुनमध्ये मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर दमदार सरी कोसळल्यानंतर जलस्रोत प्रवाही होत असत. साधारणपणे जूनच्या अखेरीपासून श्रावण महिना सुरू होईपर्यंत वर्षा पर्यटनाचा आनंद तरुणाई घेत असायची. यंदा मात्र मॉन्सूनपूर्व पावसाने ही संधी ऐन मेमध्येच उपलब्ध करून दिली. मेच्या मध्यापासून दमदार पाऊस झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना धबधबे खुणावू लागले. युवक-युवतींच्या आनंदाला त्यामुळे पारावार राहिला नाही आणि वर्षा पर्यटनाची सुरुवात झाली. साधारणपणे रविवार, शुक्रवारी, बुधवार अशा दिवशी तरुणाईची धबधब्यावर मौजमजा चालू झाली होती. तर गर्दी टाळण्यासाठी महिला आणि लहान मुले यांच्यासाठी मांसाहार विरहित दिवस निवडून गर्दी केली जात होती. त्यामुळे वर्षा पर्यटनाला बहर आला होता. मात्र, त्यानंतर गेले काही दिवस पावसाने दडी मारल्याने नैसर्गिक धबधबे प्रवाहित असले तरीही पावसाळी वातावरण नसल्याने तरुणाईमधील मजा गेली आहे. रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण आणि हवेत काहीसा गारवा अशा आल्हाददायक वातावरणात वर्षा पर्यटनाची मजा काही औरच असते. मात्र, सध्या पावसानेच वर्षा पर्यटनाला ब्रेक लावला आहे. त्यामुळे तरुणाईला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
.....................
चौकट
उन्हाळी सुट्टीत पावसाळी पर्यटन
मेमध्ये अकाली सुरू झालेले वर्षा पर्यटन अल्पावधीच बहरले आणि अनेकांची पावले देवगड तालुक्यातील तळवडे (तळेबाजार), मणचे येथे तसेच कणकवली तालुक्यातील सावडाव, सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, वैभववाडी तालुक्यातील नापणे येथे वळली. ही सर्वच ठिकाणे पर्यटकांनी बहरून गेली. आल्हाददायक वातावरण आणि अवेळी झालेला पाऊस यामुळे पर्यटकांनी उन्हाळी सुट्टीतच पावसाळी पर्यटनही अनुभवले.
....................
चौकट
वेळेआधीच वर्षा
पर्यटनाची संधी
अजून शाळा सुरू झाली नसल्याने कोकणातील पर्यटन बहरलेलेच आहे. येत्या सोमवारपासून (ता.16) शाळांची घंटा वाजणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत कमी अधिक प्रमाणात पर्यटन बहरलेले असेल. यंदा पावसाने वेळेआधी मासळी आणि आंबा हंगाम संपवला असला तरी पर्यटकांना वेळेआधीच पावसाने वर्षा पर्यटनाची संधी मात्र उपलब्ध करून दिली.
......................
चौकट
पर्यटकांनो...सुरक्षितता बाळगा
पावसाळ्यात पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना स्थानिक सुरक्षा यंत्रणेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. आपल्या आणि सोबतच्या सहकार्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अचानक वाढणारे पाणी, धबधब्यासोबत वाहून येणारे लहान दगड, गोटे यापासून सुरक्षितता मिळवली पाहिजे. त्यामुळे पर्यटकांनी पावसाळी वातावरणाचा आनंद जरूर घ्यावा; पण सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची बाब आहे.
........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.