गावच्या मालका----लोगो
(८ जून पान ६)
अन् रामा आमचा झाला...
ज्याचं बालपण खेडेगावात गेलंय त्याला निसर्गाचे, प्राणी, माणसे, विशुद्ध अन्नपाणी अन् एकूणच आनंदाची अनुभूती मिळाली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पंचमहाभुतांचे सान्निध्य लाभल्यानंतर यापेक्षा वेगळे काय घडणार? आमच्या बालपणी आमचे आजोबा अन् त्यांच्यानंतर काका पोलिसपाटील असल्याने छोटे-मोठे तंटेबखेडे आमच्या घरीच सोडवले जात. असा तंटा सोडवताना समोर आला अन् आमचाच झाला.....
-rat१४p२८.jpg-
P25N70564
---आप्पा पाध्ये-गोळवलकर, धामणी
---
छोटे-मोठे तंटेबखेडे आमच्या घरी सोडवताना असेच एकदा एक इसम आला अन् काकांना म्हणाला की, माजी तक्रार हाय. काकांनी विचारले, कसली? तर म्हणतो की, माझ्या शेतातला मोठा खैर रामाने काढून नेला. तो खैर तोडत असता मी तिथे गेलो तर माझ्या अंगावर कुऱ्हाड घेऊन धावून आला. काकांनी त्याला दुसऱ्या दिवशी बोलावला अन् रामाला तसेच गावकराला अन् खुमकऱ्यांनाही बोलावले. दुसऱ्या दिवशी रामासह सारे आले. बैठक सुरू झाली तसं काका अन् सरपंच असणारे माझे चुलत आजोबा आबा यांनी रामाला फैलावर धरले आणि विचारले, रामा तू सदूच्या शेतातला खैर तोडलास? रामा लगेचच उत्तरला, होय तोडला नी विकला पण. माझी चूक आहे, मला काय ते शासन करा. सारे लोक च्याट झाले. कारण, रामा हा रागीट होताच; पण देवदयेने अफाट शरीरयष्टीचा होता. जेवायचा किती ५/६ भाकऱ्या अन् एक किलोचा भात लागे त्याला एकावेळी. असे दिवसातून तीनदा अर्थात, कामही तसेच होते. चारीची वरंड आणायचा ती दोन माणसांना उचलता येत नसे. मग आबा त्याला म्हणाले, रामा, तुला चूक मान्य आहे तेव्हा तू पंचवीस रुपये दंड भर. आता त्या वेळी ही रक्कम तशी मोठीच. थोडा वेळ गेला. कोणीच काही बोलेना. तेव्हा तात्या म्हणाले, रामा काय ते बोलणे घे. तसे रामा ताडकन् म्हणाला, तात्यानू मंग बगताव, काय भरून टाका पंच्चीस रूपे. मी उद्यापास्न तुमच्याकडे गडी राहीन पैकं फिटेपातूर.
सगळे हसू लागले; पण तात्यांनी त्याला पैसे दिले अन् त्याने ते बैठकीत भरले. दुसऱ्या दिसापासून रामा आमच्याकडे रूजू झाला तो पुढे ३०-३५ वर्षे आमच्याकडेच राहिला अन् कुटुंबाचा एक घटकच होऊन गेला. कधी त्याला म्हावरं/मटण खायची लहर आली तरच तो घरी जाई; पण सक्काळीच हजर असे. आजुबाजूचे लोक त्याला कामाला बोलावीत. तात्यांना सांगून हा जाईसुद्धा; पण एकदा त्याने निर्णय जाहीर करून टाकला की, तात्या मला कोंच्याकडं पाटवू नुका. तात्या म्हणाले का रे रामा? तर म्हणतो, अवो बाकीच्यांकडे माजं पॉट भरत नाय.
एकदा काय झाले, आमचे शेजारी देवरूखला शिफ्ट झाले तेव्हा त्यांचे घरसामान देवरूखला न्यायचे म्हणून तात्यांनी रामाला त्या ट्रकबरोबर पाठवला. शेजारी म्हणाला की, मी रामाला जेवू घालून पांच रूपये देईन. झाले, सामान घेऊन देवरूखला जाऊन रामाने एकट्याने नव्या घरी सामान लावून दिले. येताना संगमेश्वरात शेजारी रामाला यादवरावांच्या हॉटेलात घेऊन गेला अन् म्हणाला, रामा तू पोटभर जेव हो. हॉटेलच्या त्या पातळ चपात्या रामा एक/दोन घासात एक या प्रमाणात खावू लागला. अशा चाळीस चपात्या खाल्ल्यावर स्वत: यादवराव मुकादम गल्ल्यावरून उठून रामापाशी आले अन् त्याच्यासमोर हात जोडून म्हणाले, आता चपात्या संपल्यात; पण भात आहे तो वाढू का? रामा म्हणतो चालेल! दोन ताटे भरून त्याने भात खाल्ला तेव्हा शांत झाला तो; पण यादवरावही दिलदार माणूस. शेजाऱ्याला म्हणाले की, या इसमाच्या जेवणाची बिलं मला नको. कारण, असा पट्टीचा खाणारा कधीतरीच भेटतो.
रामा कधी डॉक्टरकडे गेल्याचे मला स्मरत नाही. तापबीप आला की, सकाळी परसावातल्या लवंग्या मिरच्या बचकभर (रामाची बचक बरं का) घेऊन यायचा अन् काकूला म्हणायचा, वैन्ये आज चाराच्या पांच भाकऱ्या दे गो न्ह्यारीला. अन् त्या भाकऱ्यांवर त्या मिरच्या ठेवून त्यांचा रोल करायचा अन् खायचा. विचारले की, म्हणे अवो आगीन आग मरत्ये. अशी माणसे आता होणे नाही. आम्हाला त्याचा सहवास लाभला ह्यापरते भाग्य नाही. एका बुक्क्यात आंडील पाड्याला खाली बसायला लावणारा आमचा रामा आज या जगात नाही; मात्र माझ्या हृदयात मात्र आहे.
(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.