कोकण

हत्ती आक्रमक; अधिवास विस्तारला

CD

72503

हत्ती आक्रमक; अधिवास विस्तारला

मुक्काम झोळंबे, खडपडेत; पावसाळाभर स्थिरावण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. २३ ः हत्तींच्या कळपाने आपला अधिवास विस्तारल्याने भीती आणखी गडद झाली आहे. हा कळप गेले दीड ते दोन आठवडे झोळंबे आणि खडपडे या भागात स्थिरावला आहे. दीर्घकाळ कळप स्थिरावल्याने तो पावसाळाभर याच भागात राहण्याची भीती स्थानिकांना सतावते आहे. कळप आक्रमक झाला असून, दोन दिवसांपूर्वी त्यांचे लोकेशन शोधणाऱ्या टीमचा पाठलाग केल्याचा प्रकारही घडला.
गणेश आणि ओंकार या टस्करांसह एकूण सहा हत्तींचा कळप गेले काही महिने कोलझर परिसरात धुमाकुळ घालत आहे. या कळपात एक लहान मादी आणि दोन पिल्ले आहेत. या कळपाला गणेश हा टस्कर येवून मिळाल्यानंतर त्यांचे उपद्रवमूल्य वाढले आहे. कोलझर आणि तळकट येथे वस्तीलगत उतरून एका रात्रीत ते बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान करत आहेत. हा कळप साधारण दीड आठवड्यापूर्वी तळकटमध्ये नुकसान करून गायब झाला होता. मोठा पाऊस असल्याने त्यांचे लोकेशन मिळत नव्हते. या कळपात लहान पिल्ले असल्याने ते शक्यतो नदी पार करत नाहीत. त्यामुळे खडपडेमार्गे घाटावर चढून जाण्याचा पर्याय आता जवळपास नसल्यात जमा आहे. असे असूनही कळपाचे लोकेशन मिळत नसल्याने तो नेमका स्थिरावला कुठे याबाबत साशंकता होती.
आठवड्याभरापूर्वी या कळपाचे लोकेशन सापडले आहे. ते झोळंबे आणि खडपडे गावच्या सिमेवर झोळंबे हद्दीतील जंगलमय भागात असल्याचे वन विभागाने ड्रोनच्या मदतीने शोधले आहे. हा कळप तेथील शिदाची माटी व देवाचा गुणा या भागाच्या परिसरात गेले काही दिवस तळ ठोकून होता. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातून जंगल तुडवत वर गेल्यानंतर मोठा माळरानासारखा भाग आहे. यात पाणवठेही आहेत. पूर्वी पावसाळ्यात येथे गुरे चरण्यासाठी नेली जायची. या भागात चिवारीच्या बेटांची संख्या मोठी आहे. शिवाय भेंडलेमाडही बऱ्यापैकी आहेत. खाद्य पुरेसे उपलब्ध असल्याने ते येथे स्थिरावल्याचा अंदाज व्यक्त होत होता. तीन दिवसांपूर्वी कळपाने पुन्हा आपला मुक्काम खडपडेच्या दिशेने हलवला. तेथील मुख्य रस्त्याच्या जवळपास जंगलात ते ठाण मांडून होते. काल रात्री मात्र कळप पुन्हा झोळंबेतील राऊळवाडी येथे पोहोचला. तेथे रात्रभर थांबून आज पहाटे पुन्हा जुने खडपडे या भागात त्यांनी तळ ठोकला. वनविभागाची पथके झोळंबे आणि खडपडे परिसरात गस्त घालत आहेत. हा कळप कधीही खाली उतरून नुकसान करण्याची भीती आहे. आता या ठिकाणाहून कोलझर, तळकटसह झोळंबेतील बागायतीत घुसण्याचा मार्ग या कळपासमोर आहे. त्यामुळे येत्या काळात हत्तींकडुन होणाऱ्या नुकसानीची तीव्रता आणखी वाढेल, अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.
---------------
अधिवास विस्तारला
हा कळप गेला महिनाभर तळकट आणि कोलझरमध्येच ठाण मांडून होता. त्यावेळी दिवसा त्यांचा मुक्काम दोन्ही गावांच्या सिमेवरील बाद्याची राय या भागात होता. तेथे ओलसर माती, गारवा असल्यामुळे दिवसभर ते विश्रांती घ्यायचे. आता त्यांनी हा मुक्काम झोळंबेतील शिदाची माटी येथे हलवला आहे. तेथेही पाणथळ आणि त्यांना अधिवासाला हवी तशी जागा आहे. हा कळप हळूहळू अशाच जागा शोधत पुढे असणीयेमार्गे सावंतवाडीच्या दिशेने मार्गक्रमन करण्याची शक्यता आहे.
---------------
वनताराच्या टीमचा हत्तींकडून पाठलाग
दोन दिवसांपूर्वी गुजरामधील अंबानी समूहाच्या वनतारा प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी या हत्तींच्या अभ्यासासाठी आले होते. वन विभागाने हत्ती उपद्रव रोखण्यासाठी त्यांची मदत मागितली आहे. वनताराच्या अधिकाऱ्यांसह वन विभागाची टीम कळपाला शोधण्यासाठी खडपडे परिसरात गेली. तेथे त्यांचे लोकेशनही सापडले. मात्र, या सगळ्यांना पाहुन कळप आक्रमक झाला. त्यांनी या टीमचा पाठलाग केला. अखेर त्या सगळ्यांना माघारी तळकटमध्ये यावे लागले.
----------------
कोट
दोडामार्ग तालुक्यातील सध्या हत्तींचा वावर असलेल्या झोळंबे, तळकट, कोलझर या ठिकाणी ‘वनतारा’चे अधिकारी हत्तींच्या हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी आले आहेत. ज्या ‘ओंकार’ नावाच्या हत्तीला पकडायचे आहे, त्या हत्तीचा सकाळपासून ते सायंकाळपर्यंत वावर कशा पद्धतीचा आहे? रात्रीच्या वेळेत त्याची वर्तवणूक कशी असते? मनुष्य दिसल्यावर तो कसा आक्रमक बनतो? कोणत्या प्रकारे तो चाल करतो?
याचा अभ्यास ते करीत आहेत. त्यांच्यासोबत स्थानिक वन विभागाचे कर्मचारीदेखील आहेत.
- सुहास पाटील, प्रभारी वनक्षेत्रपाल, दोडामार्ग
----------------
हत्तींच्या उपद्रवावर मार्ग
काढण्यासाठी बैठक बोलवा
सुनील तटकरे ः वनमंत्र्यांकडे केली मागणी
दोडामार्ग, ता. २३ ः तालुक्यातील हत्तींचा उपद्रव वाढला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बैठक आयोजित करावी आणि ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.
तालुक्यात हत्तींचा धुडगुस सुरू आहे. कोलझर-तळकट, झोळंबे पंचक्रोशीत कोट्यावधीची हानी झाली आहे. असे असूनही त्यांना या भागातून मागे परतवण्यासाठी काहीच हालचाली होत नसल्याचे चित्र आहे. स्थानिकांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. स्थानिक सत्ताधारी नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश चिटणीस सुरेश गवस, जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी श्री. तटकरे यांना यात लक्ष घालण्याची विनंती करणारे निवेदन दिले होते. यावर तटकरे यांनी तातडीने वनमंत्र्यांना पत्र लिहून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी विनंती करणारे निवेदन दिले आहे. याला वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि आपल्यालाही निमंत्रीत करावे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

Latest Maharashtra News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT