-rat३०p३३.jpg-
२५N७४२५०
संगमेश्वर ः मुंबई-गोवा महामार्गावर उक्षी येथे रस्त्यावर पडलेले खड्डे.
----
चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त
पालकमंत्र्यांचे आश्वासन : महामार्गाच्या पाहणीनंतर खड्डे भरण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ : पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. ५ जुलैपर्यंत चिपळूण ते रत्नागिरीदरम्यानचे खड्डे भरण्यात येतील, असे आश्वासन दिले. विरोधकांनी टीका करण्यापूर्वी पालकमंत्री ॲक्शन मोडवर आले.
मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुक्त करण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. ५ जुलैपर्यंत मोठे खड्डे भरण्याची सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला केली आहे. चिपळूण ते रत्नागिरीदरम्यानचा हा महामार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. काही ठिकाणी अपघाताचा धोका आहे. रस्ते खचण्याची भीतीसुद्धा वाहनचालकांमध्ये आहे. आरवलीपासून पुढे चौपदरीकरणाचे काम उशिराने हाती घेण्यात आले. आरवली ते हातखंबादरम्यानचा एकेरी मार्ग पूर्ण झाला आहे. दुसऱ्या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा मोठा धोका आहे. खेरशेत, आरवली, धामणी, कडवईफाटा, तुरळपासून अगदी हातखंब्यापर्यंत रस्ता चौपदरीकरणासाठी डोंगर फोडण्यात आले आहे. या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे.
खड्ड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणे मोठे दिव्य ठरत आहे. मागील दहा वर्षाचा इतिहास पाहता पावसाळी अधिवेशनामध्ये दरवर्षी विरोधक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा विषय उचलून धरतात. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंत रस्त्याची पाहणी करतात आणि चाकरमान्यांसह स्थानिकांना तात्पुरते आश्वासन दिले जात होते.
---
एका दगडात दोन पक्षी
यावर्षी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आणि गणेशोत्सवासाठी चाकरमानी येण्यापूर्वी पालकमंत्री सामंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला धारेवर धरले आहे. तसेच विरोधकांची धारही कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते भाजपकडे आहे. भाजपचे मंत्री रत्नागिरी जिल्ह्यात येऊन चाकरमान्यांची सहानुभूती घेण्यापूर्वी तसेच हा विषय अधिवेशनात विरोधकांनी उचलण्यापूर्वी पालकमंत्री सामंत यांनी महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी पाऊल उचलले त्यामुळे पालकमंत्र्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.