74767
वैभववाडी पंचायत समिती इमारत अद्याप अपूर्णच
अकरा वर्षांनंतरही काम सुरूच; उद्घाटनाची प्रतीक्षा; खर्च पोहोचला तब्बल ४ कोटी ७३ लाखांवर
एकनाथ पवार : सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २ : वैभववाडी पंचायत समिती इमारतीचे काम तब्बल अकरा वर्षांनंतरही सुरूच असून, या इमारतीचा खर्च आता ४ कोटी ७३ लाखांवर पोहोचणार आहे; मात्र असे असले तरी या इमारतीचे उद्घाटन कधी होणार आणि ती वापरात कधी येणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
वैभववाडी पंचायत समिती इमारत प्रशस्त असावी, या हेतूने तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी २०१३ मध्ये वैभववाडी पंचायत समिती इमारतीसाठी २ कोटी ५४ लाखांचा निधी मंजूर करून दिला. या इमारतीचे भूमिपूजनही २०१४ मध्ये त्यांच्याच हस्ते झाले. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. इमारतीचे काम सुरू झाल्यापासून निकृष्ट कामामुळे ही इमारत चर्चेत आली. इमारतीचे उभारलेले निकृष्ट खांबदेखील तोडण्यात आले. अडीच-तीन वर्षांनंतर इमारतीचे काम पूर्ण झाले; परंतु पहिल्याच वर्षी इमारतीला गळती सुरू झाली. त्यामुळे या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटची नौटंकी करण्यात आली; परंतु गुणनियंत्रक विभागाने इमारतीच्या दर्जाबाबत कोणताही आक्षेप न घेता थेट इमारतीची गळती रोखण्यासाठी छपरांचा पर्याय सुचविला. या इमारतीच्या दर्जावरून अनेक आंदोलने झाली.
सतत चर्चेत राहिल्याने तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी छपरासाठी लागणारा निधी नियोजन समितीतून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ३७ लाखांचा निधी दिला. त्यानंतर या इमारतीवर छप्पर घालण्यात आले आहे. इमारतीवर छप्पर झाल्यानंतर पुन्हा एकदा उद्घाटनाची चर्चा सुरू झाली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण असताना उद्घाटनाची तयारीदेखील झाली; मात्र ही चर्चादेखील हवेतच विरली.
या इमारतीमध्ये नवीन फर्निचर आणि परिसर सुशोभीकरणासाठी शासनाने पुन्हा एकदा १ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर केला. त्यामुळे फर्निचर आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. हे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे; परंतु फर्निचरचे काम पूर्ण होण्यास अजूनही महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतरच या इमारतीचे उद्घाटन होईल, अशी शक्यता आहे.
चौकट
इमारतीचा खर्च वाढता वाढे
या इमारतीला सुरुवातीला २ कोटी ५४ लाख, त्यानंतर छपराकरिता ३७ लाख रुपये आणि आता फर्निचर आणि सुशोभीकरणासाठी १ कोटी ८२ लाख रुपये असा एकूण ४ कोटी ७३ लाख रुपये खर्च होणार आहेत. या इमारतीचे भूमिपूजन झाल्यानंतर आतापर्यंत नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाण आणि आता नीतेश राणे असे पाच पालकमंत्री झाले. त्यामुळे आता तरी या इमारतीचा प्रश्न सुटावा, अशी तालुकावासीयांची अपेक्षा आहे.
कोट
पंचायत समितीमधील फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात हे काम पूर्ण होईल. याशिवाय परिसर सुशोभीकरणाचे कामदेखील पूर्णत्वाकडे असून, सरंक्षक भिंतीसह अन्य सर्व कामे पूर्ण झाली आहेत.
- विनायक चव्हाण, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग.
कोट
फर्निचर, इलेक्ट्रिक, पाणी, संरक्षक भिंती अशी अनेक कामे शिल्लक होती. यातील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही अंतिम टप्प्यात असून, येत्या पंधरा-वीस दिवसांत ती पूर्ण होतील. १५ ऑगस्टपूर्वी या इमारतीचे उद्घाटन होईल.
- सुधीर नकाशे, तालुकाध्यक्ष, भाजप, वैभववाडी
कोट
चार ते साडेचार कोटी खर्चून उभारलेली इमारत उभी असताना सध्या पंचायत समितीचा कारभार दोन पत्रा शेडमध्ये सुरू आहे. हे पूर्णतः सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. आता तरी इमारतीचे उद्घाटन करावे आणि कर्मचाऱ्यांना चांगल्या जागेत बसण्याची संधी द्यावी.
- मंगेश लोके, तालुकाप्रमुख, ठाकरे शिवसेना, वैभववाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.