७४८१३
वाढाव्यात
७४८१४
रत्नागिरीत सफाई कर्मचाऱ्यास मारहाण
फोन न उचलल्याचा राग ः माफीनाम्यानंतर पडदा; पालिका कामगारांची एकजूट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : पालिकेच्या सफाई कामगाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी घडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने ही मारहाण केली. फोन न उचलण्यावरून राजिवडा येथे मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेनंतर संतापलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले; मात्र ठाकरे गटाच्या पदाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून त्या कार्यकर्त्याने लेखी माफीनामा दिल्यानंतर प्रकरण निवळले आणि कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. भविष्यात असे काही केले तर याद राख, नोकरीचा विचार करणार नाही. काय व्हायचे ते होऊ दे, अशा शब्दांत कर्मचारी, अधिकाऱ्यांनी त्या कार्यकर्त्याला सुनावले.
पालिकेच्या सफाई कामगारांचे मुकादम मनोहर कदम राजिवडा येथे सफाई कामासाठी गेले होते. तेथील ठाकरे गटाचे कार्यकर्ते साजिद पावसकर त्यांना फोन करत होते; परंतु त्यांनी फोन उचलला नाही, यामुळे पावसकर संतापले. कदम राजिवडा येथे गेल्यानंतर कदम आणि पावसकर आमनेसामने आले. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. पावसकर याने कदम यांना मारहाण केली. शासकीय काम करताना मारहाण केल्यामुळे पालिकेच्या कर्मचारी संघटनेने एकत्र येऊन कामबंद आंदोलन पुकारले. सर्व कर्मचारी पालिकेत गोळा झाले. घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पावसकर यांचे नेहमीच असे वागणे असते, असा आरोप कर्मचाऱ्यांनी करत प्रचंड संताप व्यक्त केला. पावसकर याला ताब्यात देण्याची मागणी कर्मचारी करत होते; परंतु शहरप्रमुख प्रशांत साळुंखे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. गुन्हा दाखल न करता काहीतरी तोडगा काढा, अशी विनंती साळुंखे यांनी केली. साळुंखे, साजिद पावसकर मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये होते. अखेर पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारण्यापेक्षा पावसकर यांनी लेखी माफीनामा द्यावा, अशी मागणी सफाई कर्मचाऱ्यांनी केली. त्यानंतर पावसकर यानी लेखी माफीनामा दिला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांसमोर पावसकर यांनी मनोहर कदम यांची माफी मागितली.
पावसकर यांच्या कृतीने पालिका कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड चीड होती. हा विषय मिटवण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसकर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आले. तेव्हा मात्र अधिकाऱ्यांचा संयम सुटला. या कर्मचाऱ्यांमुळे आपले शहर स्वच्छ आहे. ते कोणत्या परिस्थितीमध्ये काम करतात, हे सांगायची गरज नाही. सफाई कर्मचारी म्हणून त्यांना कोणी वाली नाही, असे समजू नका. नोकरी गेली तर बेहत्तर; पण पुन्हा असा प्रकार घडला तर त्याला जागा दाखवून देऊ, असे अधिकाऱ्यांनी पावसकर यांना सुनावले.
पालिकेबाहेर घोषणाबाजी
पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर पावसकर यांनी गुन्हा दाखल होऊ नये यासाठी त्या कर्मचाऱ्याची माफी मागितली. जाहीर माफी मागितल्यानंतर कर्मचारी एकजुटीचा विजय असो, अशा पालिकेच्याबाहेर घोषणा देऊन कर्मचारी कामाला निघून गेले.
दृष्टिक्षेपात
पालिका कर्मचारी, अधिकारी संतापले
पुन्हा घडले तर नोकरीवर लाथ मारू
अधिकाऱ्यांनी नेत्यानाही सुनावले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.