-rat३p२२.jpg-
२५N७४९९८
खेड ः भडगाव-खोंडे ग्रामपंचायत हद्दीतील विविध इमारतींचे सांडपाणी लगतच्या जागेत साठून राहत आहे.
------
भडगाव-खोंड्यात सांडपाण्याचा तलाव
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : कचऱ्याचे ढीग, आरोग्यावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ ः तालुक्यातील भडगाव व खोंडे गावाचे शहरीकरण होत आहे; मात्र त्याबरोबरच अनेक समस्याही उद्भवत आहेत. खोंडे गावात इमारतीच्या शेजारी सांडपाण्याचे तलाव साचले असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. ही परिस्थिती ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. शैक्षणिक संस्था या गावात असल्याने दररोज तालुक्यातील सर्वच भागातून येथे दररोज शेकडो मुले ये-जा करत असतात. त्यामुळे तातडीने संबंधित यंत्रणेने याबाबत योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
खेड तालुक्यातील शहराजवळ असलेली गावे झपाट्याने विकसित होत आहेत. शहराजवळील भडगाव, खोंडे, भरणे व भोस्ते या गावामध्ये वाढत्या लोकंख्येमुळे तीन ते चारमजली निवासी व व्यापारीसंकुल उभी राहिली आहेत; परंतु शहरीकरणाच्या या प्रक्रियेत येथील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीवर कचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनासाठी ताण येऊ लागला आहे. खोंडे गावात ज्ञानदीप, सहजीवन या शैक्षणिक संस्थांनी विविध विद्याशाखा सुरू केल्या आहेत. या भागात लोकवस्ती वाढली असून, नागरिकांची वर्दळ वाढली आहे. या शाळा-महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता नादुरुस्त झाला आहे. त्या रस्त्यावरून आता या लगतच्या जागात साठलेले सांडपाणीदेखील वाहू लागल्याने यातून माग काढताना विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थांना नाकावर हात घेऊन चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. भडगाव खोंडे ग्रुप ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न सुमारे बावीस लाख रुपये आहे. त्यामध्ये बारा लाख रुपयांची घरपट्टी तर उर्वरित सुमारे दहा लाख रुपयांची पाणीपट्टी जमा केली जाते. खेड शहराला खेटून असलेली ग्रामपंचायत म्हणून ओळख असली तरी ग्रामपंचायतीकडे स्वतःचे इतर आर्थिक उत्पन्नाचे मार्ग नाहीत. यामुळे गावातील विकासकामांना लागणारा निधी मिळवण्यासाठी शासनावर अवलंबून राहावे लागत आहे.
-----
कोट १
खोंडे येथील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी स्वतंत्र गटार उभारण्याचे नियोजन केले होते; मात्र गटार बांधणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या मालकांची संमती न मिळाल्याने काम थांबले होते. याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरच जमीन मालकांची संमती घेऊन गटाराचे काम पूर्ण करण्यात येईल.
- मीनाक्षी वाजे, ग्रामविस्तार अधिकारी, भडगाव -खोंडे ग्रामपंचायत
-----
कोट २
आमच्या शाळेच्या प्रवेशद्वारावरच कचरा टाकण्यात येतो. या संदर्भात आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केलेला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीने स्थानिक ग्रामस्थांना तशा लेखी सूचनादेखील केल्या आहेत; परंतु स्थानिक ग्रामस्थांच्या आडमुठेपणामुळे प्रशालेच्या प्रवेशद्वारावर गेली अनेक वर्षे कचरा टाकण्यात येत आहे. तरी या संदर्भात ग्रामपंचायतीने योग्य ती पावले उचलून तत्काळ कार्यवाही करावी.
- राजकुमार मगदूम, मुख्याध्यापक, ज्ञानदीप विद्यामंदिर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.