rat4p22.jpg -
75243
चिपळूण ः दुरुस्ती न झाल्याने जिल्हा परिषद शाळेस लागलेली गळती.
----------
शाळांच्या दुरुस्तीबाबत राजकीय पक्षांची चुप्पी
सेमी इंग्रजी, हिंदीवरून मात्र राजकारण; गळक्या शाळेतच बसतात विद्यार्थी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ः एकीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीपासून सेमी इंग्रजी सुरू करण्याचा ढिंडोरा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पिटवला जात आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारणही ढवळून निघाले आहे. चिपळूण तालुक्यातील तब्बल ३९ शाळांची विदारक अवस्था समोर आली आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटूनही या शाळांची दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना गळक्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. भाषेवरून राजकारण करणाऱ्या पक्षांना या गोष्टीचे ना सोयर आहे ना सुतक.
खासगी शाळांच्या तुलनेत विद्यार्थी पटसंख्या वाढवण्याच्यादृष्टीने प्रयत्न होत असले तरी आजही जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती जैसे थे आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा शिक्षणासाठीचा आधार बनून राहिल्या आहेत. यातील ३९ शाळा नादुरूस्त असून, त्याच्या दुरुस्तीचे प्रस्ताव त्या त्या शाळांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पाठवले आहेत. निवडणुकीदरम्यान काही शाळांची दरम्यान दुरुस्तीझाल्या. तरीही तालुक्यातील ३९ शाळा नादुरुस्त आहेत. दुरुस्तीमध्ये छप्पर, वर्गखोली, खिडकी दुरुस्तीचा प्रामुख्याने समावेश आहे. दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवूनही त्यावर कार्यवाही झालेली नाही.
शाळांमध्ये कोणती भाषा शिकवावी, त्याची सक्ती करावी की नाही याबाबत मोर्चा काढण्याचा इशारा देणारे नंतर जल्लोष करणारे विविध राजकीय पक्ष ग्रामीण भागातील शाळांच्या दुरुस्तीबाबत मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत अधिवेशनातही आवाज उठवताना लोकप्रतिनिधी दिसत नाहीत.
चौकट
दुरुस्तीची गरज असलेल्या शाळा
तालुक्यातील गोंधळे, भोसले, हडकणी, कोळकेवाडी जांबराई, गोवळकोट मराठी शाळा, मूर्तवडे नं. २, कळंबट ब्राह्मण गव्हाळवाडी, उमरोली नं. एक, चिपळूण कन्या शाळा, पाग मुलांची शाळा, असुर्डे बनेवाडी, मार्गताम्हाणे, दहिवलीखुर्द, कापरे देऊळवाडा, गांग्रई गावणंवाडी नं. एक, पाचाड नं. एक, गुळवणे, कुंभार्ली नं. एक, मांडकीखुर्द, राधानगर, वीर नं. चार, खांदाट पुनर्वसन, विद्यामंदिर सती, पोफळी ऐनाचेतळे, नांदिवसे गावठाण, कामथे नं. २, पिलवलीतर्फे वेळंब, खेरशेत नं. दोन, टाकेवाडी, कोळकेवाडी हसरेवाडी, कोळकेवाडी पठारवाडी, कोसबी घाणेकरवाडी, आगवे नं.१, असुर्डे नं. तीन, बोरगाव नं. एक, उभळे नं. दोन, नांदिवसे लुगडेवाडी या शाळांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
कोट
तालुक्यातील नादुरुस्त जिल्हा परिषद शाळांच्या इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव यापूर्वीच जिल्हास्तरावर पाठवण्यात आला आहे. दुरूस्तीसाठीचा अपेक्षित खर्चही त्यासोबत कळवला आहे.
- प्रदीपकुमार शेडगे, गटशिक्षणाधिकारी, चिपळूण
जिल्हा परिषद शाळांबाबत राज्यसरकार प्रचंड उदासीन आहे. जिल्ह्यात केवळ विकासाचा गवगवा केला जातो. प्रत्यक्षात देशाची भावी पिढी घडणाऱ्या शाळांच्या दुरुस्तीसाठी कवडीचा निधी मिळत नाही. एकाच खोलीत पहिली ते पाचवीचे वर्ग भरवून शिक्षण दिले जात असल्याची विदारक स्थिती आहे. भांडवलशाही धार्जिण्या सरकारकडून जिल्हा परिषद शाळांची गळचेपी सुरू आहे.
- सचिन शेट्ये, विभागप्रमुख, ठाकरे शिवसेना, चिपळूण
तालुक्यातील नादुरुस्त झालेल्या शाळांच्या इमारत दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार निरंजन डावखरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शाळा दुरुस्तीबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार तालुक्यातील काही शाळांना दुरुस्तीसाठी निधीदेखील मिळाला. उर्वरित शाळांसाठी सरकार प्रयत्नशील आहे.
- विनोद भुरण, तालुकाध्यक्ष, भाजप चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.