लांजा डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प-------लोगो
कोत्रेवाडीवासीयांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न
रवींद्र डोळस : ठाकरे शिवसेनेचे आज लाक्षणिक उपोषण
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ७ ः कोत्रेवाडी येथील लोकवस्तीजवळील डम्पिंग ग्राउंड प्रकल्प राबवून येथील नागरिकांना देशोधडीला लावण्याचा लांजा नगरपंचायतीचा प्रयत्न आहे, तो हाणून पाडला जाईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी दिला आहे.
लांजा नगरपंचायतीतर्फे कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रस्तावित आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून या डम्पिंग ग्राउंड विरोधात रणशिंग फुंकलेले आहे. सातत्याने ग्रामस्थांकडून आंदोलने, उपोषणं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने डम्पिंग ग्राउंड हटावसाठी ८ जुलैला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत उपजिल्हाप्रमुख डोळस म्हणाले, ‘आम्ही कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे आहोत. आम्ही कोत्रेवाडी ग्रामस्थांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही. नगरपंचायत जोर जबरदस्तीने हा प्रकल्प राबवू पाहत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. डंम्पिंग ग्राउंडविरोधातील उपोषणावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश कारंबेळे व तालुका पदाधिकारी, तसेच शहर प्रमुख मोहन तोडकरी यांच्यासह शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख सहभागी होणार आहेत.
चौकट
स्थलांतरित करेपर्यंत प्रयत्न करणार
डम्पिंग ग्राउंड विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी गेल्या चार वर्षांपासून दिलेला लढा हा अतिशय योग्य आहे आणि म्हणूनच आम्हीही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. जोपर्यंत कोत्रेवाडी येथून हा धोकादायक प्रकल्प रद्द होत नाही किंवा तो अन्य ठिकाणी स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ग्रामस्थांच्या सोबत ताकदीनिशी उभा असून मंगळवारी छेडण्यात आलेले उपोषण हे न भूतो न भविष्यती असे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
---