‘चिपळूण पतसंस्थे’च्या
शिबिरात १५० जणांचे रक्तदान
चिपळूण ः केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना सप्ताहानिमित्त चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १५० जणांनी सहभाग नोंदवला होता. याचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सुभाषराव चव्हाण, प्रशांत यादव, माजी आमदार सदानंद चव्हाण, संचालिका स्मिता चव्हाण, सीईओ स्वप्ना यादव, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, अॅड. नयना पवार, अशोक साबळे, अशोक कदम, सूर्यकांत खेतले, उमेश सकपाळ आदी उपस्थित होते. या वेळी सामंत म्हणाले, ‘चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ज्या पद्धतीने कार्यरत आहे ती कार्यपद्धती संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी आदर्शवत आहे. सहकार भवनासारखी सुंदर वास्तू आणि संस्थेची कारभारशैली हे संपूर्ण तळकोकणासाठी गौरवाची बाब आहे. संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, उद्योजक प्रशांत यादव, सीईओ स्वप्ना यादव आणि संचालक मंडळाच्या कार्यामुळे ही संस्था केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही समृद्ध आहे. दरवर्षी सहकारदिनानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन समाजसेवेचा आदर्श पतसंस्थेने घालून दिला आहे.’ भविष्यात अशा उपक्रमांसाठी शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करू.
अण्णाभाऊ साठे
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा
चिपळूण : दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत जिल्ह्यातील विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या पहिल्या तीन किंवा पाच विद्यार्थ्यांना दरवर्षी निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी विद्यार्थ्यांनी २० जुलैपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात विशेष प्रावीण्याने ६० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या संबंधित जातीतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुणक्रमांकानुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. आवश्यक कागदपत्रे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शरीरसौष्ठव स्पर्धेत
रोहन भालेकरचे यश
साडवली : ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय नॅचरल महाराष्ट्र श्री २०२५-२६ शरीरसौष्ठव स्पर्धेत देवरूखच्या टायटन जिमच्या रोहन भालेकर यांनी दोन गटांमध्ये चमकदार कामगिरी करून रत्नागिरी जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला. ही स्पर्धा ठाणे नौपाडा येथे झाली. या स्पर्धेत दोन्ही प्रकारांमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेत सात गटांचा तर जीन्स मॉडेल स्पर्धेत दोन गटांचा समावेश होता. भालेकर यांनी जीन्स मॉडेल स्पर्धेतील दुसऱ्या गटात (२३ ते ३० वर्षापर्यंत) तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे तर शरीरसौष्ठव स्पर्धेतील सातव्या गटात (खुला वर्ग उंची १७० सें. मी. वरील) सहावा क्रमांक प्राप्त केला आहे. भालेकर यांना टायटन जिमचे मालक व व्यवस्थापक सागर संसारे आणि नासिर फुलारी, प्रशिक्षक नंदकिशोर साळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांना भक्ती भालेकर, दीपक करंडे, हर्ष कोटकर, नितेश कांबळे, आकाश कांबळे, विधाता जाधव आणि सुजित कांबळे यांचे बहुमोल साह्य लाभत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.