टोलेजंग सदनिकामुळे सांडपाण्याची समस्या
जालगाव परिसर; पाणथळ जागेत इमारतींना धोका
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १२ : तालुक्यातील जालगाव परिसरात उभारल्या जात असलेल्या टोलेजंग सदनिका आणि त्यामुळेच उद्भवणाऱ्या सांडपाण्यासारख्या विविध समस्यांबाबत जालगाव ग्रामस्थांनी दापोली उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
नैसर्गिक सुंदरता नष्ट करून जालगाव गावात सिमेंटची जंगले उभी राहात असून, कमी जागेत टोलेजंग सदनिका उभारल्या जात आहेत. यासाठी बांधकाम परवानगी देणे, सदनिका पूर्णत्वाचा दाखला देणे या बाबी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येत नाहीत, त्यामुळेच नगररचना कार्यालयाने घालून दिलेल्या नियम व अटी यांची पायमल्ली केल्यानंतरही प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी न करता त्यांना पूर्णत्वाचा दाखला मिळतो. त्या अनुषंगानेच सांडपाण्यासारख्या समस्या उद्भवून ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होत असल्याची आणि अशा इमारती गावात असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
जमिनीची चाचणी न घेता पाणथळ जागेत इमारत उभारून भविष्यातील धोका उत्पन्न होऊ नये यासाठी सॉईल टेस्टिंग परवानगी दिलेल्या इमारतीत फिल्टर प्लॅंट बसवला आहे की नाही, इमारत वगळून आजूबाजूला योग्य क्षेत्र सोडले जात आहे का? याची खातरजमा करणे यासारख्या असंख्य बाबी आपल्या स्तरावर गांभीर्यपूर्वक पाहण्याची गरज असल्याचे या वेळी ग्रामस्थांकडून चर्चेदरम्यान सांगण्यात आले.
या वेळी गावसई अध्यक्ष अशोक जालगावकर, माजी उपसभापती मनोज भांबीड, उपसरपंच स्वप्नील भाटकर, माजी उपसरपंच विलास जालगावकर, शिरीष देसाई, ग्रामपंचायत सदस्य मयूर मोहिते, कुंभारवाडी अध्यक्ष संतोष वायकर, ब्राह्मणवाडी महालक्ष्मी देवस्थान माजी अध्यक्ष सुरेश मिसाळ, श्रीरामनगर अध्यक्ष योगेश साटम, आनंदनगर अध्यक्ष मंगेश भैरमकर, अनंत पालकर आदी उपस्थित होते.
चौकट
ग्रामपंचायतीला विचारात घेऊनच निर्णय
यावर होऊ घातलेल्या सदनिकांच्या माध्यमातून गावात निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत ग्रामपंचायतीला विचारात घेऊनच निर्णय घ्यावे लागतील. दिलेल्या परवानगीबाबत तपासणीही करावी लागेल, हे तत्त्वत: मान्य करून परवानगी देताना शासकीय स्तरावर यापुढे निश्चितच विचार केला जाईल, असे सूर्यवंशी यांनी उपस्थित ग्रामस्थांना ठामपणे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.