77091
विजेचा ‘खेळखंडोबा’ त्वरित थांबवा
ग्राहक संघटनेची मागणी; सावंतवाडीत महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः कोकणातील मुख्य सण गणेशोत्सव जवळ येत असल्याने गणेशोत्सव कालावधीत आणि उत्सवापूर्वी गणेश शाळांना अखंडित वीजपुरवठा व्हावा तसेच वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार थांबवावेत, यासाठी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची भेट घेतली.
यावेळी तालुक्यातील इतर डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना देखील उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. यावेळी सहायक अभियंता वीणा मठकर, सहायक अभियंता विठ्ठल काटकर (ग्रामीण- २) यांच्यासह प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, तालुका सचिव संतोष तावडे, तुकाराम म्हापसेकर आदी उपस्थित होते. यावेळी वीज ग्राहक संघटना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याच्या विरोधात असून, ग्राहकांना फसवून एकही मीटर बसवू नये, असे उपकार्यकारी अभियंत्यांना सांगण्यात आले.
सावंतवाडी तालुक्यात यापूर्वी कधीही एवढ्या प्रमाणात वीज खंडित होण्याचे प्रकार होत नव्हते; परंतु शहरात मोठ्या प्रमाणावर वीज खंडित होण्याचे प्रकार वाढल्याबाबत सहायक अभियंता मठकर यांना प्रश्न केला असता, गेल्या वर्षीपर्यंत ११० दाब होता, तो वाढून यावर्षी १५० पर्यंत गेल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शहरात गरड भागात जरी वीजप्रश्न निर्माण झाला तरी तेथील पुरवठा बंद करण्यासाठी काही क्षण मुख्य वाहिनी बंद करावी लागते. अशावेळी वीज काही क्षणासाठी जाऊन येणे म्हणजे खंडित होत नाही तर सुरक्षित काम करण्यासाठी तसे करावे लागते. लवकरच यावर देखील तोडगा काढला जाईल, असे त्यांनी आश्वस्त केले.
गणेशोत्सव जवळ येत असून, तालुक्यातील प्रत्येक गावात दोन ते चार गणपती शाळा आहेत. त्यामुळे गावातील वीजपुरवठा जास्त वेळ खंडित राहू नये, यासाठी काय तयारी केली, असा प्रश्न राक्षे यांना करण्यात आला. यावर त्यांनी, मुख्य वाहिनी आणि एलटी वाहिनीवरील झाडी तोडण्याचे काम प्राधान्याने हाती घेतल्याचे सांगितले. कुणकेरी येथील झाडी तोडण्यासाठी पगारावर मदतनीस देण्याची मागणी करण्यात आली, त्यावर पदाधिकाऱ्यांनी कामगार देणार असल्याचे सांगितले. शहरातील संचयनी जवळील औदुंबर झाडाची धोकादायक फांदी तोडण्याबाबत देखील चर्चा झाली; परंतु ती तोडण्यासाठी खर्च कोणी पेलावा, यावर चर्चा अडली. त्यावरही लवकरच तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. सावंतवाडी शहर ‘अंडरग्राउंड’ करण्यासाठी निधीची मागणी केल्याचे त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरासाठी वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या वाहिन्यांचे चार पर्याय उपलब्ध असल्याचे, तसेच सब स्टेशनमध्ये एखाद्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास अतिरिक्त ट्रान्स्फॉर्मर देखील उपलब्ध करून ठेवल्याचे त्यांनी चर्चेदरम्यान सांगितले.
---
स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध
मळेवाड ते तळवडे नवीन वाहिनीचे काम पूर्ण झाले असून सुरक्षा चाचणी झाल्यावर ती सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे गणेशोत्सवापूर्वी ओटवणे येथील वीजवाहिनीचे काम देखील पूर्णत्वास नेण्यात येईल, याची खात्री अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी उपस्थित वीज ग्राहकांनी स्मार्ट प्रीपेड मीटर आपल्या घरी बसवू नये, यासाठीचे छापील अर्ज भरून कार्यालयात देत पोहोच घेतली. या चर्चेसाठी श्यामसुंदर रेडकर, मनोज घाटकर, श्रीकृष्ण तेली, जीवन लाड, प्रमोद मेस्त्री, तेजस लाड आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.